पत्रकारांच्या वसाहतीसाठी प्राधिकरणाचा भूखंड आरक्षित करा; आमदार लक्ष्मण जगताप यांची मागणी

0
732

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमधील सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांची वसाहत निर्माण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा भूखंड आरक्षित ठेवण्यात यावा, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार जगताप यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष खाडे यांना पत्र दिले आहे.

पत्रामध्ये म्हटले आहे, “छोट्या-मोठ्या गावांना एकत्र करून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अस्तित्वात आली. महापालिकेच्या माध्यमातून परिसरात मोठ्या प्रमाणात विकास झाला. तसेच शहरात आलेल्या अनेक कंपन्यांच्यामुळे रोजगार देणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख निर्माण झाली. आता हे शहर एक महानगर म्हणून विकसित होत आहे. गावखेड्यापासून ते शहर अशी जडणघडण होत असताना विकास प्रक्रियेत सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. या महानगरातील घडामोडी लोकांच्यापर्यंत पोहोचवणारे प्रसारमाध्यमांचे पत्रकार शहरात मोठ्या संख्येने राहत आहेत.

शहराच्या सामाजिक क्षेत्रात या पत्रकारांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्यामार्फत समाजात जनजागृती होते. विकासाभिमुख पत्रकारीतेतूनच समाजाची उन्नती होते व सामाजिक उलथापालथीच्या आजच्या काळात नवासमाज निर्माण करण्याचे काम पत्रकार करत असतात. त्याची दखल आपणही घेणे गरजेचे आहे. किंबहुना आपले ते सामाजिक उत्तरदायित्व आहे. अनेक पत्रकारांना तुटपुंजे वेतन मिळत असते. त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबासाठी हक्काचा निवारा करणे अनेकदा अवघड बनते. त्यामुळे पत्रकारांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा यासाठी प्राधिकरणाचा एक भूखंड आरक्षित ठेवण्यात यावा. या भूखंडावर पत्रकार वसाहत उभारण्यात यावे. त्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया प्राधिकरण प्रशासनाकडून पूर्ण करून राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात यावा, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.”