मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीत सामील होणार?

0
448

मुंबई, दि,१६ (पीसीबी) – मोदीविरोधाच्या बहाण्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये प्रवेश मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या काँग्रेसने मनसेला महाआघाडीमध्ये सामील करण्यास विरोध केला होता, तोच काँग्रेस आता विधानसभेच्या तोंडावर मोदीविरोधकांची एकजूट बांधण्यासाठी मनसेला सोबत घेण्यास उत्सुक दिसत आहे. राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर मनसे काँग्रेसला साथ देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात काँग्रेस नेत्यांसोबत याविषयी सकारात्मक चर्चा करत आहेत.

लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीने राज ठाकरेंना हिरवा कंदील दाखवला होता, परंतु काँग्रेसकडून त्यांना अटकाव झाला होता. मात्र राज्यात काँग्रेस कमकुवत स्थितीत असल्यामुळे सशक्त पर्यात म्हणून काँग्रेस समविचारी पक्षांची मोट बांधण्याच्या तयारीत आहे. विधानसभा निवडणुकीत समविचारी पक्षांसोबत निवडणूक लढवण्याचा मानस बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमधील पत्रकार परिषदेत बोलून दाखवला होता.

आघाडीची चर्चा सकारात्मक पद्धतीने अंतिम टप्प्यात पोहचली आहे. मात्र ही राजकीय समीकरणे जुळवताना वाटेत काही अडथळे होते. येत्या काही दिवसात या अडचणी सुटतील, अशा आशा व्यक्त केली जात आहे. मनसेला मुख्य विरोध होता, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांचा. महाराष्ट्रात मनसेला सोबत घेतल्यास उत्तर भारतीय वोट बँकेवर परिणाम होईल, अशी भीती काही नेत्यांना होती. मात्र सद्य परिस्थिती पाहता, राज ठाकरेंना सोबत घेण्यातच शहाणपण असल्याचे पक्षाला वाटत आहे.