पगार वेळेवर न झाल्याने बस चालकाने उचललं टोकाचं पाऊल; घरात गळफास घेत संपवली जीवनयात्रा

0
412

बीड, दि.१२ (पीसीबी) : पगार वेळेवर न झाल्याने चिंताग्रस्त बस चालकाने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. महिन्याच्या सात तारखेला कर्मचाऱ्यांची पगार होत असते, परंतु गेल्या काही महिन्यापासून पगार वेळेवर होत नसल्याने तुकाराम सानप यांनी आत्महत्या केली आहे. तुकाराम सानप हे बीड आगारात वाहन चालक होते. गेल्या काही महिन्यांपासून पगार वेळेवर होत नसल्याने आगारातील कर्मचाऱ्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतोय.

बीड आगारातील वाहन चालक तुकाराम सानप यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती नातेवाईकांनी आणि बस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी दिली आहे. तुकाराम सानप यांनी सोमवारी दिवसभर नियोजनानुसार बसच्या फेऱ्या पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर संध्याकाळी घरी गेल्यानंतर त्यांनी बीड शहरातील अंकुश नगर इथल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

मृत बस चालक तुकाराम सानप यांच्या घरची लाईट गेल्या १५ दिवसापुर्वी कट केली होती, अशी माहिती मिळत आहे. तसेच घरातील किराणा देखील संपला होता, त्यात सात तारखेला पगार न झाल्याने तुकाराम सानप चिंतेत होते आणि त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली आहे. दरम्यान, काम करुन सुद्धा कर्मचाऱ्यांना वेळेवर पगात मिळत नसतील तर संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद करा, अशी मागणी बस कर्मचारी करत आहेत.

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात संगमनेर शहरातील बस स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्ये गळफास घेत बसचालकाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. सुभाष शिवलिंग तेलोरे या चालकाने कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले होते. यासंदर्भात त्यांनी चिट्ठी लिहून आत्महत्या केली होती.