पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा दिला सल्ला

0
296

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि लसींचा निर्माण झालेला तुटवडा या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार आणि भाजप नेत्यांमध्ये जुंपलेली असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धीर दिला आहे. तुम्ही आरोपांकडे लक्ष देऊ नका, तुमच्या कामावर भर द्या, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे यांना धीर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी राज्यातील कोरोना स्थितीचा पंतप्रधानांनी आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनावरून सुरू असलेल्या राजकारणाकडे पंतप्रधानांचं लक्ष वेधलं. कोरोनावरून राजकारण करू नये म्हणून सर्व पक्षांना समजवा. कोरोना महामारीत राजकारण आणू नका म्हणून या लोकांना सांगा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना सांगितलं. तसेच राज्यात मोठ्याप्रमाणावर टेस्टिंग वाढवण्यात येत आहेत. ही टेस्टिंग अजून वाढवण्यात येत आहे. मात्र, केंद्राकडूनही आम्हाला सुविधा देण्यात याव्यात. राज्याला ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्ससाठी मदत करा, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली.

यावेळी मोदींनी उद्धव ठाकरे यांना आरोपांकडे लक्ष देऊ नका, तुमच्या कामावर लक्ष द्या, असा सल्ला दिला. कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी तुम्ही चिंता करू नका. रुग्णांची संख्या वाढल्याने आपली कामगिरी खराब होतेय, असा समज करून घेऊ नका. मी आताही तुम्हाला टेस्टिंग वाढवण्यावर भर देण्याचा सल्ला देईन. संक्रमितांची संख्या वाढल्याने आपली कामगिरी खराब आहे, असा विचार करण्याची गरज नाही. तुम्ही टेस्टिंग वाढवली तर तुमची रुग्ण संख्या वाढताना दिसणारच, अशा शब्दात मोदींनी उद्धव ठाकरेंना आश्वस्त केलं. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यांमध्ये एकप्रकारची स्पर्धा सुरू झाली आहे. हे राज्य कोरोना रोखण्यात अपयशी ठरत आहे तर ते राज्य कोरोना रोखण्यात यशस्वी होत आहे. अशा प्रकारची तुलना होत आहे. एकमेकांची तुलना करण्याची राज्यांमध्ये सध्या फॅशन सुरू झाली आहे. ती बंद करा, असं मोदी म्हणाले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी येत्या 11 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान व्हॅक्सीन महोत्सवाचं आयोजन करण्याचं आवाहन ही त्यांनी केलं. हे आयोजन करताना कोणी कोणतंही राजकारण करू नये. मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारशी समन्वय साधला तर आपण सर्वजण मिळून कोरोनावर मात करू शकतो, असं सांगतानाच 45 वर्षांवरील सर्वांनाच कोरोनाची लस देण्यावर भर देण्याचा सल्लाही त्यांनी दिला.