लस घेतल्यानंतरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना कोरोनाची लागण

0
347

नागपूर, दि. १० (पीसीबी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना नागपूरच्या किंग्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना सध्या कोरोनाची सामान्य लक्षण दिसत आहेत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते सध्या नागपुरातील किंग्स रुग्णालयात उपचार घेत आहेत,” असे ट्वीट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत ट्वीटरवरुन करण्यात आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन भागवत यांना रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.

महिनाभरापूर्वी कोरोना लसीकरण
दरम्यान गेल्या महिन्यात 6 मार्चला मोहन भागवतांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. मोहन भागवत यांच्यासह संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनीही कोरोना लस घेतली होती. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी कोरोना लसीकरण केले होते. त्याच दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नीनेही संस्थेत कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.

नागपुरातील कोरोना स्थिती
नागपुरात काल दिवसभरात 6 हजार 489 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 2 हजार 175 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. काल दिवसभरात 64 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नागपुरात सध्या 49 हजार 347 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नागपुरातील एकूण रुग्णसंख्या 2 लाख 66 हजार 224 वर पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 11 हजार 236 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नागपुरात आतापर्यंत 5 हजार 641 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.