“मिठी मारून रडणे एका वैज्ञानिक संस्थेच्या प्रमुखास शोभत नाही”

0
532

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – चांद्रयान मोहीम यशस्वी न झाल्याने इस्रोचे प्रमुख के. सिवन यांना भावना अनावर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांनी मिठी मारत धीर दिल्याचा प्रसंग सर्व देशवासियांनी पाहिला. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी या प्रसंगावर आपल्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांचाही समावेश असून त्यांनी मिठी मारून रडणे एका वैज्ञानिक संस्थेच्या प्रमुखास नक्कीच शोभत नाही असे मत व्यक्त केले आहे. इस्रो प्रमुख भावविवश झाले ही बातमी भितीदायक असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

विश्वंभर चौधरी यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत आपले मत मांडले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “चांद्रयान मोहीम यशस्वी झाली नाही ही बातमी दुःखदायक आहे पण इस्रो प्रमुख भावविवश झाले ही बातमी भितीदायक आहे. कुठल्याही गोष्टीचे श्रेय घेणे वगैरे मिठी संप्रदायातील राजकारण्यांना शोभते, मिठी मारून रडणे एका वैज्ञानिक संस्थेच्या प्रमुखास नक्कीच शोभत नाही. सीवन भावविवश झाले असले तरी आपल्या या भावूकतेचाही प्रचारासाठी उपयोग केला जाऊ शकतो हे भान तरी त्यांनी ठेवायला हवे होते”.

“नासाच्याही अनेक मोहिमा अयशस्वी झालेल्या आहेत पण नासाप्रमुख अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या गळ्यात पडून रडल्याच्या चित्रफिती पाहण्यात नाहीत,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे. “फार मोठ्या शास्त्रज्ञांनी इस्रो सांभाळली आहे, अनेक अपयशं पचवली आहेत. मोहीम फत्ते झाली की टाळ्या वाजवून माफक आनंद साजरा करणे आणि मोहीम अयशस्वी झाली तर कारणमीमांसा करून दुसऱ्या दिवशी पुन्हा कामाला लागणे हीच इस्रो संस्कृती आहे. तीच रहावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.