पंढरपुरात ‘विठाई’बस सेवेचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण

0
709

पंढरपूर, दि. २३ (पीसीबी) – पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी)  सोमवारपासून (दि.२४) नवीन बससेवा सुरू केली आहे. या सेवेचे ‘विठाई’असे नामकरण करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंढरपुरात  या सेवेचे लोकार्पण करण्यात येणार आहे.  

पंढरीला जाण्यासाठी ठिकठिकाणाहून एसटीच्या नियमित बसेससह प्रासंगिक करारावर बस उपलब्ध असतात. अनेक भाविक खासगी वाहनांने प्रवास करतात. मात्र, अनेकदा त्यांना मार्गावर विविध अडचणींचा सामना करावा लागतो. मुक्काम, जेवणाची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने खास पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी ‘विठाई’ ही नवीन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाचे अध्यक्ष, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची ही संकल्पना आहे.

एसटीच्या प्रत्येक विभागात ही विठाई बस लवकरच दाखल होणार आहे. प्रासंगिक करार पध्दतीने सध्या जे भाडे आकारले जाते, त्या दरातही ही विठाई बस सेवा पुरविली जाणार आहे. त्यासाठी भाविकांना अगोदर गटागटाने नोंदणी करणे आवश्यक असेल. या बसने प्रवास करणाऱ्या भाविकांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्थाही एसटीकडूनच देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.  अत्यंत माफक दरात ही सेवा असल्याने खासगी वाहनांकडून भाविकांची होणारी आर्थिक लुट थांबणार आहे.