न्यूझीलंडचा भारतावर ८ गडी राखून दणदणीत विजय    

0
578

हॅमिलटन, दि. ३१ (पीसीबी) – पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत यजमान न्यूझीलंडने आपला पहिला विजय  आज (गुरूवार) नोंदवला. हॅमिलटनन वन-डे सामन्यात न्यूझीलंडने भारतावर ८ गडी राखून मात केली. भारताने विजयासाठी दिलेले ९३ धावांचे माफक आव्हान न्यूझीलंडच्या फलंदाजांनी २ गड्यांच्या बदल्यात  लीलया पूर्ण केले. भारताच्या भुवनेश्वर कुमारने  २ बळी  टिपले.  या पराभवामुळे  मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवण्याचे  भारताचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

हॅमिल्टनच्या मैदानात ट्रेंट बोल्ट आणि कॉलिन डी-ग्रँडहोमच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. हवेत वळणाऱ्या चेंडूवर भारतीय फलंदाजांची दैना उडाली. धावफलकावर ५० धावा लागायच्या आधी भारताचा निम्मा संघ  तंबूत परतला होता. मात्र, हार्दिक पांड्याने  डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही खेळपट्टीवर जास्त काळ  तग धरता आला नाही. अखेर भारताने ९२ धावांपर्यंत मजल मारली.

चौथ्या सामन्यात भारतीय डावाची सुरुवातच खराब झाली. शिखर धवन आणि रोहित शर्मा झटपट  बाद झाले. आपल्या कारकिर्दीचा २०० वा सामना खेळणाऱ्या रोहित शर्माला अवघ्या ७ धावा करता आल्या. विराट कोहलीच्या जागेवर संघात स्थान मिळालेला शुभमन गिलही चांगली कामगिरी करता आली नाही. यानंतर एकामागोमाग एक फलंदाज बोल्ट आणि डी-ग्रँडहोमच्या जाळ्यात अडकत गेले. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने १० षटकात २१ धावांमध्ये ५ तर कॉलिन डी-ग्रँडहोमने १० षटकात २६ धावांमध्ये ३ बळी घेतले. या दोघांना टॉड अॅस्टल आणि जिमी निशम यांनी प्रत्येकी १-१ बळी घेत साथ दिली