निवडणूक प्रचारात वेडा, मेंटल या शब्दांचा वापर करण्यापासून राजकारण्यांना रोखा

0
555

हैदराबाद, दि. २५ (पीसीबी) – निवडणूक प्रचारात विरोधकांसाठी सर्रासपणे वापरण्यात येणाऱ्या ‘वेडा’, ‘पागल’, ‘मेंटल’ या शब्दांवर मनोचिकित्सक सोसायटीने (आयपीएस) आक्षेप घेतला आहे. हे शब्द मनोरुग्णांचे अवमान करणारे असून अमानवीय आहेत. त्यामुळे राजकारण्यांना निवडणूक प्रचारात या शब्दांचा वापर करण्यापासून रोखावे, अशी मागणी आयपीएसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

आयपीएसचे अध्यक्ष डॉ. बी. एन. रवीश आणि डॉ. सुरेश बाडा यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहून ही तक्रार केली आहे. राजकारणी निवडणूक प्रचारात विरोधकांसाठी ‘मेंटल’ किंवा ‘वेडा’ या शब्दांचा वापर करतात. या शब्दांतून मनोरुग्णांबाबतचा भेदभाव दिसून येतो. हा शब्द मनोरुग्णांचा अवमान करणारा असून अमानवीय आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात ‘मानसिक अस्थिर’, ‘वेडा’ किंवा ‘मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करा’, आदी शब्द प्रयोग करणे चुकीचे असून त्यावर प्रचारामध्ये लगाम घालण्यात यावा, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

राजकारण्यांवर मोठी सामाजिक जबाबदारी असते. त्यांचे प्रत्येक वक्तव्य, भाषण वर्तमानपत्रांसह वृत्तवाहिन्यांवर कव्हर केले जाते. त्यामुळे नेत्यांनी जबाबदारीने वक्तव्य केले पाहिजे. निवडणूक आयोगाने या संबंधाने काही निर्देश जारी करायला हवेत, असेही या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग राजकीय पक्षांना आणि राजकारण्यांना काय निर्देश देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.