महापालिका निवडणूक! 31 मे रोजी आरक्षण सोडत, 1 जून रोजी प्रभागांचे आरक्षण

0
287

पिंपरी, दि. २३(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (एससी) महिला, अनुसूचित जमाती (एसटी) महिला आणि सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागांची सोडत 31 मे 2022 रोजी काढली जाणार आहे. सोडतीनंतर प्रभागांचे आरक्षण 1 जून रोजी प्रसिद्ध केले केले जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम महापालिकेला दिला आहे.

निवडणूक आयोगाने आज आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. अनुसूचित जाती (एससी) महिला, अनुसूचित जमाती (एसटी) महिला आणि सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढण्यासाठी 27 मे रोजी मराठी, इंग्रजीत जाहीर नोटीस प्रसिद्ध केली जाणार आहे. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागांची सोडत 31 मे 2022 रोजी काढली जाणार आहे.

सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप 1 जून रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे. प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत 1 ते 6 जून 2022 दरम्यान हरकती व सूचना दाखल करता येतील. आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर विचार करुन प्रभागनिहाय अंतिम आरक्षण 13 जून रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे.

114 जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत 46 प्रभाग तर नगरसेवक संख्या 139 असणार आहे. 139 नगरसेवकांपैकी 69 पुरुष तर 70 महिला नगरसेविका अशी वर्गवारी असेल. 139 नगरसेवकांपैकी 3 जागा अनुसूचित जमाती (एसटी)साठी तर 22 जागा अनुसूचित जाती (एससी)साठी राखीव असतील. ओबीसी आरक्षण मिळाले असते तर 38 जागा ओबीसींसाठी राखीव राहिल्या असत्या. आरक्षणाविना निवडणूक होण्याची शक्यता असल्याने ओबीसी प्रवर्गातून लढण्याची 38 जणांची संधी गेली आहे. त्यामुळे 114 जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक होईल.