निवडणुकीत रावसाहेब दानवेंनी हर्षवर्धन जाधवांना मदत केल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल

0
822

औरंगाबाद, दि. ४ (पीसीबी) – भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्याला कोणतीही मदत केली नाही, असा दावा दानवेंचे जावई आणि औरंगाबादमधून  अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. मात्र, हर्षवर्धन जाधवांची प्रचारादरम्यानची एक क्लिप  व्हायरल झाल्याने  दानवे  अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी दानवे यांच्यावर युतीधर्म न पाळल्याचा आरोप केला होता. 

हर्षवर्धन जाधव यांचा प्रचारादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर  व्हायरल झाला आहे. दानवे यांनीच पूर्ण भाजप माझ्यामागे उभे करण्याचे आश्वासन दिले होते, असा दावा हर्षवर्धन जाधव यांनी केल्याचे या व्हिडिओमध्ये  पाहायला मिळत आहे.  दरम्यान, यासंदर्भात खैरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे  तक्रार केली आहे.

दरम्यान, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरे हे भाजप-शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार आहेत. तर रावसाहेब दानवे यांचे जावई आणि शिव स्वराज्य पक्षाचे आमदार हर्षवर्धन जाधव हे देखील रिंगणात उतरले होते.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष असूनही  दानवे यांनी हर्षवर्धन जाधव यांना रोखले नाही. दानवे यांनी युतीधर्म न पाळता जावईधर्म पाळल्याचा आरोप  खैरेंनी केला होता.