निर्बंध शेवटचे, लॉकडाऊन लावावाच लागेल : पालकमंत्री

0
194

मुंबई, दि. 3 (पीसीबी) : यापुढे लावण्यात येणारे निर्बंध हे शेवटचे असतील. यानंतर मुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल, असा स्पष्ट इशारा ठाकरे सरकारमधील महत्त्वाचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे. लोक ऐकत नाहीत मी दररोज लोकांमध्ये जावून आवाहन करतोय. पुढील दोन दिवस सुद्धा प्रयत्न करणार आहे. कॉंग्रेसची भूमिका लॉकडाऊन लागू नये अशीच आहे, मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर इलाज नाही, अशी हतबलता अस्लम शेख यांनी व्यक्त केली. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते..
गेल्या दोन महिन्यांपासून आपण जे प्रतिबंध लावले आहेत, त्याबाबत मी किंवा मंत्री आणि मुख्यमंत्री स्वत: लोकांना आवाहन करुन मास्क लावण्यासाठी, गरज असेल तरच बाहेर पडण्याचं आवाहन करत आहेत. निर्बंध लावत लावत आता आपण इथवर पोहोचलो आहे. आणखी किती निर्बंध लावायचे आहेत? आता हा शेवटचा टप्पा आला आहे. आणखी किती कठोर बनायचं? ती मान्यताही संपली आहे. आता शेवटचा प्रयत्न करणार. मुंबईत लॉकडाऊन लावण्याची सरकारची आणि माझी स्वत:ची मानसिकता नाही. पण जर लोकांच्या जीवाचा प्रश्न आला की आमच्याकडे पर्याय नाही. अजून आम्ही लोकांना विनंती करत आहे. मी आज, उद्या दररोज मार्केटमध्ये जाऊन निवेदन देणार. शेवटपर्यंत प्रयत्न करु, लोकांना आवाहन करु आम्हाला मजबूर करु नका असं आवाहन करणार, असं अस्लम शेख म्हणाले.