नितीश कुमार सातव्यांदा मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री

0
316

पाटणा,दि. १७(पीसीबी): जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची सातव्यांदा सूत्रे स्वीकारली. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बिहार भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

नितीशकुमार यांच्यासह जेडीयूकडून विजय कुमार चौधरी, विजेंद्र प्रसाद यादव, अशोक चौधरी, मेवालाल चौधरी आणि शीला कुमारी, भाजपकडून तारकिशोर प्रसाद, रेणू देवी, अमरेंद्र प्रतापसिंह, मंगल पाण्डेय, रामसूरत राय, रामप्रीत पासवान, जीवेश मिश्रा आणि ‘हम’कडून संतोष कुमाल सुमन तसेच मुकेश सहानी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

10 नोव्हेंबर रोजी बिहार निवडणुकीचा निकाल लागला होता. या निवडणुकीत राजदला सर्वाधिक म्हणजे 75 तर भाजपला 74 जागा मिळाल्या होत्या. एनडीएला बिहार निवडणुकीत बहुमत मिळाल्याने अखेर नितीश कुमार यांनी राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा केला होता. त्यानुसार आज नितीश कुमार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह राजभवनात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं?

बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजपमध्ये सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरल आहे. त्यानुसार साडेतीन आमदारांमागे एक मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जाते. त्यानुसार भाजपला सर्वाधिक म्हणजे 21 मंत्रिपदं मिळतील, तर जेडीयूच्या वाट्याला बारा मंत्रिपदं येण्याची चिन्हं आहेत. हिंदुस्थानी आवाम मोर्चा (हम) आणि विकासशील इन्सान पार्टी यांना प्रत्येकी एक मंत्रिपद मिळेल. नितीश कुमार स्वतः मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार असल्याने जेडीयूतील अकरा नेत्यांना मंत्रिपदं मिळतील.

बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयू कोट्यातील 14 मंत्री रिंगणात उतरले होते. त्यापैकी आठ मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर सहा मंत्री विजयी झाले. नितीश सरकारमधील मंत्री असलेले बिजेंद्र यादव, श्रावणकुमार, बीमा भारती, नरेंद्र नारायण यादव, महेश्वर हजारी आणि मदन सहनी पुन्हा विधानसभेवर गेले. याशिवाय विधानसभा अध्यक्ष विजय चौधरी यांनीही आपली जागा राखली.