निगडीतील प्लॉगेथॉन मोहिमेला मोठा प्रतिसाद; विद्यार्थ्यांसह तृतीयपंथियांचा सहभाग

0
225

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने “प्लास्टिक मुक्त पिंपरी चिंचवड” अभियानाअंतर्गत ‘फ’ आणि ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात आज प्लॉगेथॉन मोहिम राबविण्यात आली. विद्यार्थ्यांसह तृतीयपंथियांचा उत्स्फूर्त सहभाग हे आजच्या प्लॉगेथॉन मोहिमेचे वैशिष्ट्ये होते.

फ क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील मोहिमेमध्ये सहाय्यक आयुक्त तथा स्वच्छ सर्वेक्षण समन्वयक रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे, माजी नगरसेवक सचिन चिखले, आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, राजू चोटले, धनेश्वर शेळके यांच्यासह क्षेत्रीय कार्यालयातील विविध विभागांचे प्रमुख, सहाय्यक आरोग्य अधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, जनवाणी संस्था यांचे स्वयंसेवक, प्रगती महिला बचत गट आदींसह नागरिक उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने शहरात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 25 मे ते 5 जून 2022 या कालावधीत “प्लास्टिक मुक्त पिंपरी-चिंचवड” ही मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने शहरात प्लास्टिक मुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्लॉगेथॉन मोहिमे अंतर्गत प्लास्टिक कच-याचे संकलन करण्याचे काम शहरात सुरु झाले आहे.

‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत प्रभाग क्रमांक 13 मध्ये यमुनानगर रुग्णालय ते महादेव मंदिरापर्यंत प्लॉगेथॉन मोहिम पार पडली. यावेळी रस्त्यालगत असलेला प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला. ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 3,4,5 आणि 7 मध्ये प्लॉगेथॉन मोहिम राबवून रस्त्यालगत असलेला प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला. प्रभाग क्रमांक 3 मध्ये मोशी चौक ते वहिलेनगर, प्रभाग क्रमांक 4 मध्ये मॅगझिन चौक ते बोपखेल फाटा, प्रभाग क्रमांक 5 मधील मयुरी पॅलेस मागील मैदान आणि प्रभाग क्रमांक 7 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अंकुशराव लांडगे नाट्यगृहापर्यंत प्लॉगेथॉन मोहिम राबवण्यात आली.

प्लॉगेथॉन मोहिमांच्या ठिकाणी एकदाच वापरात येणारे प्लास्टिक न वापरण्याची आणि शहर स्वच्छ तसेच सुंदर ठेवण्याची शपथ घेण्यात आली. या मोहिमेमध्ये सहाय्यक आरोग्याधिकारी राजेश भाट, आरोग्य निरीक्षक संदीप कोथावडेकर, योद्ध अकादमीचे विलास नाईकनवरे आणि प्रतिनिधी, क्लिन इंद्रायणीनगर प्रकल्पाचे सदस्य, विद्यार्थी, नागरिक आणि तृतीयपंथी यांचा सहभाग होता.