महेश लांडगेंचे कट्टर समर्थक प्रदीप तापकीर भेटले अजित पवार यांना

0
487

पिंपरी दि. २८ (पीसीबी) – चऱ्होली येथील माजी नगरसेविका विनया तापकीर यांचे पती प्रदीप तापकीर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शनिवारी (दि. २८) सकाळी भेट घेतली. भाजपा आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक अशी तापकीर यांची ओळख आहे. महापालिका निवडणुकित ते भाजपाकडून उमेदवार असणार अशी चर्चा होती, पण अजित पवार यांच्या भेटीमुळे त्यावर पडदा पडला आहे. चऱ्होली प्रभागात त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे पॅनल भाजपा विरोधात टक्कर देणार हे आता जवळपास निश्चित आहे.

अजित पवार यांच्या भेटीत काय चर्चा झाली याचा तपशिल मिळू शकला नाही. यावेळी राष्ट्रवादी काग्रेस चे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेविका विनया तापकीर यादेखील उपस्थित होत्या. आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक म्हणून प्रदीप तापकीर हे गेली तीन वर्षे त्यांच्याच वर्तुळात वावरतात. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात आता तापकीर हे राष्ट्रवादीतूनच रिंगणात उतरणार अशी चर्चा रंगली आहे. भाजपाचे सभाव्य उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

चऱ्होलीतून राष्ट्रवादीच्या तिकिटावर माजी नगरसेविका विनया तापकीर या निवडून आल्या होत्या. मात्र गेल्या पाच वर्षाच्या काळात त्यांनी व प्रदीप तापकीर यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेतल्याचे चित्र होते. भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्यासोबत प्रदीप तापकीर यांची जवळीक वाढली होती. आमदार लांडगे यांनी आयोजित केलेल्या भव्य दिव्य बैलगाडा स्पर्धेसाठी तापकीर यांनी स्वतः पाच दुचाकी बक्षिस दिल्या आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ते भाजपासोबत जातील असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र शनिवारी (दि. 28) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे आमदार महेश लांडगे गटाला तो धक्का मानला जात आहे. तसेच चऱ्होली परिसरात राजकीय उलटसुलट चर्चा रंगलया आहेत.