नारायण राणेंनी चिठ्ठी उचलून काँग्रेस प्रवेश केला – शरद पवार  

0
611

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या पक्षात प्रवेश करायचा हा राणे यांच्यासमोर पेच निर्माण झाला होता. त्यावर राणे यांनी दोन चिठ्ठय़ा टाकल्या. काँग्रेसची चिठ्ठी आल्याने त्यांनी काँग्रेसप्रवेशाचा निर्णय घेतला होता. आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला ही चूक की घोडचूक होती, याबद्दल मी बोलणार नाही,  असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  म्हटले आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मराठी आणि इंग्रजी भाषांमधील ‘नो होल्ड्स बार्ड’ आणि ‘झंझावात’ या  आत्मकथन पुस्तकांचे प्रकाशन शरद  पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते  करण्यात आले. याप्रसंगी पवार बोलत होते.

पवार म्हणाले की, काँग्रेसमध्ये प्रवेश करताना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते. पण हे आश्वासन पाळण्यात आले नाही, अशी राणे यांची तक्रार आहे. काँग्रेसमध्ये आश्वासनाची लगेचच कधीच पूर्तता केली जात नाही. ताटकळत ठेवले जाते. यातून पुढे जायचे असते. उभे आयुष्य काँग्रेसमध्ये घालविल्याने आम्ही हे शिकलो. राणे यांना बहुतेक काँग्रेसच्या राजकारणाचा अनुभव आला नसावा, अशी टिप्पणीही पवार यांनी केली.