नवाब मलिकांविरोधात भाजप कार्यकर्त्यांची जोरदार निदर्शने; नवाब मलिक यांचा पुतळा जाळला

0
234

औरंगाबाद, दि.१० (पीसीबी) : नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांची निदर्शनं सुरु आहेत. औरंगाबादमध्येही नवाब मलिक यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. भाजपचे शेकडो कार्यकर्ते आज क्रांती चौकात दाखल झाले. त्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली. औरंगाबादमधील भाजप कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात जोरदार निदर्शने करताचा मलिक यांचा पुतळा जाळला. शहरातील क्रांति चौक परिसरात हे आंदोलन सुरु असल्यामुळे शेकडो कार्यकर्त्यांचा जमाव याठिकाणी गोळा झाला होता. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

भाजप नेते आमि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नवाब मलिक यांचं डोकं ठिकाणावर नाही, त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार करावेत, असा सल्ला दिला आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींशी संबंध समोर आले आहेत. आता त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांचे गुन्हेगारांना कसे संरक्षण आहे आणि राज्यात बनावट नोटांचा खेळ कसा सुरु होता याचा गौप्यस्फोट केला. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी झाली. तेव्हा दहशतवाद संपेल, काळा पैसा बंद होईल, असे म्हटले गेले. नोटबंदीनंतर संपूर्ण देशात 2000 आणि 500 च्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. पण 8 ऑक्टोबर 2017 पर्यंत महाराष्ट्रात एकदाही बनावट नोटा पकडल्या गेल्या नाहीत. कारण फडणवीसांच्या संरक्षणात बनावट नोटांचा धंदा सुरु होता. 8 ऑक्टोबर 2027 रोजी 14 कोटी 56 लाखांच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत केली. बनावट नोटांचं नेक्सस दाऊद, बांग्लादेश आणि पाकिस्तानपर्यंत आहे, असा दावा मलिक यांनी केला आहे.