धार्मिक प्रथांमध्ये कोर्टाचा हस्तक्षेप नको; शबरीमला वादावर रजनीकांत यांची भूमिका

0
523

चेन्नई, दि. १ (पीसीबी) – शबरीमला मंदिर महिलांसाठी खुले करण्याच्या निर्णयाला दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी अप्रत्यक्षरित्या विरोध दर्शवला आहे. धार्मिक प्रथांबाबत कोर्टाने हस्तक्षेप केला नाही तर बरे होईल. जी परंपरा अनेक वर्षांपासून पाळली जाते तो भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे असे मत रजनीकांत यांनी मांडले आहे. ज्या प्रथा पूर्वापार सुरू आहेत त्या तशाच राहुदेत असे म्हणत त्यांनी एकप्रकारे विरोध दर्शवला आहे.

रजनीकांत यांचा 2.0 हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यानिमित्तानं त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत शबरीमला मंदिरातील महिलांच्या मंदिरप्रवेशाविषयी आपले मत मांडले आहे. काही गोष्टी जशा आहेत तशाच ठेवाव्यात. हा अत्यंत नाजूक विषय आहे. लोकांच्या श्रद्धा याच्याशी जोडल्या गेल्या आहेत अशा विषयात कोणीही हस्तक्षेप करू नये असे मत रजनीकांत यांनी फोनद्वारे मांडले.

लोकांच्या धार्मिक भावना आपण दुखवू नये असे त्यांचे म्हणणे आहे. धर्म आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे स्वार्थासाठी कोणीही धर्माचे राजकारण करू नये असेही रजनीकांत म्हणाले. दरम्यान रजनीकांत यांनी मांडलेले मत हा समस्त महिलांचा अपमान आहे अशा तीव्र प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या आहेत. रजनीकांत हे त्यांच्या चाहत्यांसाठी देवाच्या स्थानी आहेत. अनेकजण त्यांना देवच मानतात त्यामुळे त्यांच्याकडून अशा मताची अपेक्षाच नव्हती, अशाही प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहे.