धनगर समाजाच्या मागण्यासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना –चंद्रकांत पाटील

0
542

मुंबई, दि. ३ (पीसीबी) –  धनगर समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक शनिवारी (दि. ९) होणार आहे. त्याचबरोबर धनगर समाजाच्या आंदोलनादरम्यान   दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात येणार  आहेत, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

धनगर समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक  आहे. त्याबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार असल्याचे  पाटील यांनी गुरूवारी आंदोलकांना भेटून सांगितले होते. त्यानंतर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये विविध विभागाचे मंत्री, सचिव यांचा सहभाग आहे. धनगर समाजाला विविध सुविधा देण्यासंदर्भात या उपसमितीमध्ये निर्णय होणार आहे.

सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर नाव देण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या मंत्रीमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे. त्यानंतर लवकरच  राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज व राज्यातील मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे हे सोलापूर येथे जाऊन विद्यापाठीचे नामकरण करतील, असे पाटील यांनी सांगितले.