पिंपरीत मित्रांसोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणावर चाकुने वार

0
478

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – मित्रांसोबत गप्पा मारत बसलेल्या एका तरुणाला चार जणांच्या टोळक्यांनी चाकु, कोयता आणि लाथाबुक्यांनी जबर मारहाण करुन जखमी केले. ही घटना शनिवारी (दि.२) रात्री दीडच्या सुमारास पिंपरीतील सुभाषनगर झुलेलाल घाट येथे घडली.

गुलशन निधीचरण राऊत (वय २३, रा. पिंपरी, मिलींदनगर, विर गोगादेव आय बिल्डींग, रुम नं.१) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रिकी खेमचंदानी, विकी गिल, सन्नी गिल आणि त्यांच्या अनोळखी साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुलशन राऊत हे डिलेवरी बॉयचे काम करतात. शनिवारी रात्री दीडच्या सुमारास ते त्यांच्या काही मित्रांसोबत पिंपरीतील सुभाषनगर झुलेलाल घाट येथे गप्पा मारत बसले होते. यावेळी आरोपी रिकी, विकी, सन्नी आणि त्यांचा अनोळखी साथीदार हातात कोयता आणि चाकु घेऊन तेथे आले. त्यांनी गुलशन याला शिवीगाळ करुन, “लय नाटक झाली घाटावरच्या पोरांची” असे बोलून चाकुने त्यांच्या कपाळावर वार केला आणि लाथाबुक्यांनी जबर मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात रिकी, विकी, सन्नी आणि त्यांचा अनोळखी साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक डोलारे तपास करत आहेत.