धक्कादायक: वाकडमध्ये तरूणीशी जबरदस्ती लग्न करून बलात्कार

0
868

वाकड, दि. ७ (पीसीबी) – तरूणीला कॉलेजच्या प्रवेशद्वारावरून जबरदस्तीने दुचाकीवर बसण्यास भाग पाडून वेळोवेळी बलात्कार केला. तसेच आळंदी येथे नेऊन बळजबरीने लग्न केले. एवढ्यावरच न थांबता फेसबुकवरून तिची बदनामी करून नातेवाईकांना शिवीगाळ केली. हा प्रकार सप्टेंबर २०१६ पासून वाकड येथे घडला.

याप्रकरणी पीडित २१ वर्षीय तरूणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चंद्रशेखर भागवत केकाण (रा. खंडाळा, ता. बीड) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०१६ मध्ये पीडित तरूणी कॉलेजमध्ये होती. यावेळी आरोपी चंद्रशेखर याने तिला कॉलेज प्रवेशद्वारावरून बळजबरीने दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला वाल्हेकरवाडी येथील त्याच्या घरी नेले. तेथे बदनामी व जीवे मारण्यची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मित्रांच्या मदतीने मोटारीत बसवून आळंदी येथे नेले आणि जबरदस्तीने लग्न करून वारंवार बलात्कार केला. तसेच फेसबुकवर तिची बदनामी करून नातेवाईकांना शिवीगाळ केली. सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी तपास करत आहेत.