धक्कादायक, बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकांने केली तब्बल ३७ लाख रुपयांची मागणी

0
348

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – महिला दिनाच्या पूर्व संध्येला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेची समजूत घालून बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एका पोलीस उपनिरीक्षकांने तब्बल ३७ लाख रुपयांची मागणी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. त्यापैकी ७ लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पोलीस उपनिरीक्षकाला अटक केली आहे. भरत लक्ष्मणराव मुंढे (वय ३३) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. मुंढे हा सध्या ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात नेमणुकीला आहे.

याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा तपास भरत मुंढे याच्याकडे आला होता. त्याने यातील आरोपीशी संपर्क साधला. त्याला गुन्ह्यात अटक करु नये, यासाठी लाच मागितली. तसेच त्याच्या नातेवाईकालाही सहआरोपी करण्याची धमकी दिली. त्यानंतर मुंढे याने बलात्काराच्या गुन्ह्यातील तक्रारदार हिची समजूत घालून त्याच्याविरुद्ध तक्रार करु नये, यासाठी त्याने तक्रारदाराकडे स्वत:साठी ५ लाख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक याच्यासाठी २ लाख व बलात्काराच्या गुन्ह्यातील फिर्यादीला देण्यासाठी ३० लाख रुपये अशी एकूण ३७ लाख रुपये लाचेची मागणी केली.

त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची ४ मार्च रोजी पडताळणी केली. त्यात भरत मुंढे याने ३७ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या ३७ लाखांपैकी ७ लाख रुपयांची लाच घेताना भरत मुंढे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.