धक्कादायक , पत्रकाराची भररस्त्यात हत्या..

0
585

सुरत दि. १४ (पीसीबी) –37 वर्षीय व्यक्तीची पत्नी आणि तीन मुलींसमोर हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. मयत जुनेद खान पठाण एका स्थानिक साप्ताहिकात काम करत होते. गुजरातमधील सुरत शहरात रांदेर परिसरात रविवारी ही घटना घडली. हत्येच्या वेळी पत्नी आणि तीन मुलींसह शहापूर वड येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी पठाण जात होते. चौघा आरोपींनी आधी आपली कार पत्रकाराच्या बाईकवर घातली होती. कारने मागून धडक दिल्यानंतर बाईकवरुन प्रवास करणारे पाचही जण रस्त्यावर पडले. त्यानंतर कोणाला काही कळण्याच्या आधीच कारमधील चौघांनी खाली उतरुन पठाण यांच्या पाठीत चाकू खुपसला आणि त्यांची निर्घृण हत्या केली. भर दिवसा भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मयत पत्रकार जुनेद खान पठाण एका स्थानिक साप्ताहिकासाठी काम करत होते. रविवारी ते पत्नी आणि तीन मुलांसह शहापूर वड येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी बाईकने निघाले होते.
गजबजलेल्या जिलानी पुलावरुन ते जात असताना मागून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली, त्यानंतर ते पाचही जण रस्त्यावर पडले. ते सावरण्याआधी आणि काही समजण्यापूर्वीच चार जणांनी कारमधून खाली उतरुन पठाण यांच्या पाठीत चाकूने वार केले.
पादचाऱ्यांनी पठाण यांना जवळच्या रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्याच्या मुलींचे वय 10 वर्षे, चार वर्षे आहे, तर सर्वात लहान मुलगी अवघ्या अडीच वर्षांची आहे.
रांदेर पोलिसात खून प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे. “प्राथमिक तपासात पठाण यांची हत्या वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याचं दिसून येत आहे. कुटुंबातील सदस्यांनी आम्हाला चार संशयितांची नावे दिली आहेत” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, अतिरिक्त पोलिस आयुक्त शरद सिंघल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, शहरात खुनांचे प्रमाण कमी झाले आहे. “जानेवारी 2021 मध्ये झालेल्या 12 हत्यांच्या तुलनेत जानेवारी 2022 मध्ये सुरत शहरात फक्त दोन खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत. फेब्रुवारीमध्ये सहा खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत” असे त्यांनी सांगितले.
सिंघल म्हणाले की, गेल्या दीड महिन्यात दाखल झालेले आठ गुन्हे उघडकीस आले असून आरोपींना पकडण्यात आले आहे. सहा हत्या वैयक्तिक शत्रुत्व किंवा कौटुंबिक वादातून घडल्या होत्या.