ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटले

0
342

इंदोरी, दि. १४ (पीसीबी) – ट्रकला अपघात झाल्याने खाली उतरून पाहणी करत असताना तीन जणांनी चाकूचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटले. ही घटना रविवारी (दि. 13) मध्यरात्री पावणे तीन वाजता मावळ तालुक्यातील इंदोरी येथे घडली.

चंद्रभान नामदेव बिराजदार (वय 27, रा. तळेगाव स्टेशन, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बिराजदार हे ट्रक चालक आहेत. त्यांच्या ट्रकचा रविवारी मध्यरात्री पावणे तीन वाजताच्या सुमारास इंदोरी येथे किरकोळ अपघात झाला. त्यामुळे ते ट्रकमधून खाली उतरून टॉर्चने ट्रकची पाहणी करत होते. त्यावेळी एका दुचाकीवरून तिघेजण आले.

दुचाकीवरून आलेल्या तिघांनी बिराजदार यांच्या मानेला आणि पोटाला चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर जबरदस्तीने बिराजदार यांचा पाच हजारांचा मोबाईल फोन आणि आठ हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली. पोलीस उपनिरीक्षक गोविंद चव्हाण तपास करीत आहेत