`चऱ्होली प्रभागात दिघी नको` वाद पेटला…

0
381

– भाजपाच्या त्या नगरसेवकांना दिघीची जनता धडा शिकवेल…

– पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – चऱ्होली प्रभागाला दिघी जोडू नका, वगळा अशी हरकत घेणाऱ्या भाजपातील काही नगरसेवकांच्या विरोधात आता स्थानिक जनता पेटून उठली आहे. भाजपाचे हे नगरसेवक चऱ्होली प्रभागात दिघी नको म्हणत असततील तर उद्या ते मते मागायला आले तर, दिघीकरांचा अपमान केला म्हणून त्यांना जाब विचारण्याच्या तयारीत काही नागरिक आहे. दरम्यान, हा दिघी मधील जनतेच्या अस्मितेचा हा मुद्दा झाल्याने आता हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता असून त्यात भाजपाची मोठी कोंडी होऊ शकते, अशीही चर्चा आहे.

या संदर्भात माजी नगरसेवक किसन तापकिरयांचे चिरंजीव अ‍ॅ.कुणाल तापकीर यांनी एक निवेदन जारी केले असून दिघीला वगळा म्हणनाऱ्यांना लोक चोख उत्तर देतील असे त्यांनी म्हटले आहे.
तापकीर यांनी निवेदनात म्हटले आहे की, दिघी मधील सर्व सुज्ञ मतदार बंधू-भगिनींनो आपल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आणि परिसरात सध्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. असे असताना आपल्या सोयीप्रमाणे प्रभाग रचना करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराची उमेदवाराची धावपळ चाललेली दिसत आहे. यामध्येच अनेक नेते बेताल अशी वक्तव्य करीत आहेत. आपल्या माहीत असेल 2002 साली त्रिसदस्यीय रचना असताना चऱ्होली आणि दिघी हा एकमेकांना जोडलेला प्रभाग होता. यापूर्वी या भागांमध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून माझे वडील किसन महाराज तापकीर नगरसेवक असताना त्यांनी दिघी आणि चऱ्होली परिसरामध्ये विविध विकास कामे केलेली होती. त्यानंतर 2007 साली झालेल्या निवडणुकीमध्ये एक सदस्यीय प्रभाग असताना वडमुखवाडी आणि दिघीचा भाग अशी रचना होती.
आता होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपामधील विद्यमान नगरसेवक आणि या परिसरातील नेते यांनी दिघीचा भाग चऱ्होली प्रभागात जोडू नये, याकरिता शासन दरबारी खेटे घालण्यास सुरुवात केलेली आहे. चऱ्होली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रहिवासी संकुले तसेच विविध मोठ्या मोठ्या सोसायट्या उभे राहत आहेत. त्या तुलनेमध्ये दिघी परिसरात डेव्हलपमेंटची कमी आहे. याचाच स्वार्थी विचार करून हा भाग जोडल्यास त्याचा कोणताही फायदा भविष्यात होणार नाही, असे गणित बांधून भाजपामधील काही नगरसेवकांनी दिघीला चऱ्होली प्रभागात न जोडण्याचा स्वार्थी घाट घातलेला आहे.
समस्त दिघी मधील सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो या पत्राच्या माध्यमातून आम्ही आपणास आवाहन करत आहोत, जे लोक सध्या दिघी चा भाग चऱ्होली प्रभागात जोडला जाऊ नये म्हणून वेगवेगळे खटाटोप करीत आहेत, परंतु येणाऱ्या काळात सुदैवाने वॉर्ड रचना न बदलल्यास दिघी-चऱ्होली असा एकत्रित प्रभाग होईल आणि त्यावेळेस निवडणुकीच्या काळात ‘आता दिघी चऱ्होली जोडण्यास नको’ म्हणणारे हे स्वार्थी उमेदवार तुमच्या दारामध्ये मतदान मागण्यासाठी नक्कीच येतील. मतदार बंधु भगिनींनो तुमच्याकडे विकास कमी आहे म्हणून तुम्हाला नाकारणाऱ्या या स्वार्थी उमेदवारांना तुम्ही मतदान करणार का ? तसेच येणाऱ्या उमेदवारांना ‘तुम्हाला दिघी आणि आम्ही नको होते म्हणून तुम्ही जे खटाटोप करीत होता ते साध्य झाले नाही, मग आता तुम्ही आमच्या कडे मत मागायला का आला ? हा प्रश्न नक्की विचारा. लोकहो जे उमेदवार त्यांच्या आर्थिक भविष्याची गणित बांधून आपल्याला नाकारत असतील तर असे धोकादायक स्वार्थी आणि स्वार्थाचे राजकारण दिघी ची जनता नक्कीच धडा शिकवेल, असा इशारा तापकिर यांनी दिला आहे.