‘द ताश्कंद फाइल्स’चं प्रदर्शन रोखण्यासाठी काँग्रेसमधल्या एका बड्या कुटुंबाचा दबाव, दिग्दर्शकाचा आरोप

0
527

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूवरील प्रश्नांवर ‘द ताश्कंद फाइल्स’ हा चित्रपट १२ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. मात्र या चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्यासाठी काँग्रेसमधले काही बडे नेते आपल्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीनं केला आहे.

‘द ताश्कंद फाइल्स’ चित्रपटाच्या निर्मात्यांना प्रदर्शन थांबवण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. ही नोटीस शास्त्री कुटुंबीयांकडून पाठवण्यात आली असली तरी काँग्रेस पक्षामधलं एक मोठं कुटुंब शास्त्री कुटुंबीयांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत असल्याचा आरोप विवेक अग्नीहोत्रीनं केला आहे. ”या चित्रपटाची भीती काँग्रेसमधल्या नेत्यांना वाटते त्यामुळे शास्त्री कुटुंबीयांना पुढे करून ते चित्रपटाचं प्रदर्शन थांबवू पाहत आहे. मला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकावलं जात आहे मी या प्रकरणात महाराष्ट्र सरकारची मदत घेतली आहे. लाल बहादूर शास्त्री यांचे नातू आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विभाकर शास्त्री यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत मला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या चित्रपटात जे काही दाखवलं आहे ते खोटं असल्याचा त्यांचा दावा आहे. काँग्रेसमधल्या एका बड्या कुटुंबानं विभाकर यांच्यावर चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्यासाठी दबाव टाकला असल्याचं विवेक यांनी ‘द रिपब्लिक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

७ एप्रिलला मुंबईत या चित्रपटाचं स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगसाठी शास्त्री कुटुंब उपस्थित होतं त्यांनी चित्रपट पाहिला मग आता चित्रपटावर आक्षेप घेण्याचं कारण काय असा सवालही त्यांनी विचारला आहे. काँग्रेस पक्ष खूपच घाबरला आहे आपण यात दोषी असल्याचं या पक्षाला वाटत आहे म्हणूनच त्यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली असं अग्निहोत्री यांचं म्हणणं आहे.  हा चित्रपट पूर्णपणे पत्रकरांना समर्पित आहे. मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही मी लढा देणार असंही त्यांनी स्पष्ट केलं.

‘द ताश्कंद फाइल्स’ विषयी थोडक्यात

ताश्कंद डिक्लरेशन’ ऊर्फ ‘ताश्कंद अ‍ॅग्रिमेंट’ हा शांतता करार भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताश्कंद येथे १० जानेवारी १९६६ रोजी केला गेला. सोव्हिएत युनियनचे प्रमुख अलेक्सी कोसिजीन यांच्या मध्यस्थीने झालेल्या करारावर भारत सरकारच्या वतीने पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी, तर पाकिस्तानच्या वतीने पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी सह्य़ा केल्या. ताश्कंदच्या या शांतता कराराची औपचारिकता पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी, ११ जानेवारी १९६६ रोजी भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे अकस्मात निधन झाले. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या घडामोडींचं चित्रण ‘द ताश्कंद फाइल्स’ मध्ये पहायला मिळणार आहे.