देहू-आळंदी रस्त्यावरील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी गजाआड; २ लाख ६६ हजाराचा मुद्देमाल जप्त

1792

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – देहू-आळंदी रस्त्यावरील रिगल पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा टोळक्यांच्या चिखली पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ४ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून २ लाख ६६ हजार किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई चिखली पोलिसांनी देहू-आळंदी रस्त्यावरील वडाच्या मळ्याजवळ केली.

अश्वजित सुभाष मोरे (वय १९, रा. पुण्यनगरी, हौसिंग सोसायटी, घरकुल वसाहत, चिखली), सचिन विक्रम म्हस्के (वय २०, मोरेवस्ती, चिखली), ज्ञानेश्वर श्रीराम ढाकणे (वय २०, घरकुल वसाहत, चिखली), साजिद मुमताज खान (वय १९, घरकुल वसाहत, चिखली), आतिश बलदेव कोरी (वय २०, घरकुल वसाहत, चिखली), आणि विकास उर्फ पांग्या जाधव (रा. शरदनगर, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या टोळक्यांची नावे आहेत. यांच्यासह दोन विधिसंघर्षीत बालक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहू आळंदी रस्त्यावरील रिगल पेट्रोलपंपावर दिवसभर जमा झालेली रोकड लुटणार असणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक लोखंडी तलवार, दोन कोयते. एक चाकू, तिन मोबाईल फोन, आणि इतर साहित्य असा एकून १४ हजार ६३० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.

दरम्यान, पोलिसांनी त्यांना अटक करून पोलिस कोठडीत केलेल्या तपासात त्यांच्याकडून दोन पल्सर मोटार सायकली, एक होंडा डिओ गाडी, चार मोबाईल असा एकून २ लाख ३२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत  आला.  तसेच चिखली पोलिस ठाण्यात १० हजार किंमतीचा मोबाईल चोरीचा १ गुन्हा, चिंचवड पोलिस ठाण्यात १, भोसरी पोलिस ठाण्यात १ असे एकूण ४ गुन्हे उघडकीस आले आहेत. दरम्यान, पोलिसांनी दोन विधिसंघर्षीत बालकांना ताब्यात घेतले असून एकूण मुद्देमाल २ लाख ६६ हजार ६३० रुपये किंमतीचा हस्तगत केला आहे. पोलिस तपास करत आहेत.