देशात पुणे हॉटस्पॉट, सर्वाधिक कोरोना रुग्णवाढीचा वेग

0
231

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – जगात कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ६५ लाखाच्यावर तर भारतात १३.८५ लाखावर आहे. आपल्या देशात राज्यनिहाय विचार केला तर महाराष्ट्रात पावणे चार लाख आणि राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्हा अव्वल (८५ हजार) ठरला आहे. गेल्या आठ-दहा दिवसांत देशातील रोजची सरासरी रुग्णवाढ ५० हजार, तर राज्यातील १० हजार आहे. मुंबई, ठाणे, नागपूरचा विचार केला तर पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये रुग्णांची वाढ ही अगदी डोळे पांढरे करणारी म्हणजे तब्बल ३ ते ४ हजारा प्रमाणे आहे. पूर्ण देशात पुणे आता `हॉट स्पॉट` ठरत असल्याने तो चिंतेचा विषय झाला आहे.

मुंबई, चेन्नई, दिल्ली, हैद्राबाद अशा मेट्रो शहरांतूनसुध्दा रोज सरासरी २ हजारा पेक्षा कमी कोरोना रुग्णवाढ आहे. शनिवारी एका दिवसात पुणे जिल्हा (१७८३), शहर (१५२१) आणि पिंपरी चिंचवड(१०७५) मिळून ४,३७९ पर्यंत कोरोना रुग्णांची वाढ, तर मृतांची संख्या तब्बल ९३ आहे. आजवर गेल्या चार महिन्यांतील रुग्णांची संख्या १,२८,२८८, तर उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७७,६२१ आहे. आजवरची मृतांची संख्या तब्बल ३,१२२ पर्यंत गेली आहे. राज्यातील एकाही जिल्ह्यात अशी भयंकर स्थिती नाही. रोजची रुग्ण वाढ, मृतांची संख्या पुणे पंचक्रोशितील नागरिकांना धडकी निर्माण कऱणारी आहे.
गेल्या आठवड्यातील कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम असल्याने प्रशासकीय यंत्रणाही झाडून कामाला लागली आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १३ ते २३ असा लॉकडाऊन पुणे व पिंपरी चिंचवड शहरात करण्यात आला. त्या काळातच रुग्णांची संख्या दुप्पट-तिप्पट वाढत गेली. त्यामागे महत्वाचे कारण सांगितले जाते, ते म्हणजे पूर्वी कोरोना चाचणी अवघी ४००-५०० पर्यंत होत असे. आता रोज दोन-तीन हजारा पर्यंत कोरोना चाचणी होते, त्यामुळेच रुग्णांची संख्या वाढलेली दिसते आहे. आता आणखी चाचण्या वाढविण्याचा विचार असल्याने आगामी काळात कोरोनाचा उद्रेक झालेला दिसेल. पुणे शहर हा त्याचा केंद्र बिंदू आहे. शहरातील केंटेन्मेंट झोनची संख्या रोज वाढतच असल्याने
पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील रुग्ण वाढ इतकी आहे की, गेले दहा दिवसांपासून कोरोना रुग्णांना बेड उइपलब्ध नाही, व्हेंटिलेटर मिळत नाही, उपचारासाठी डॉक्टरांचा तपास नाही अशा शेकडो तक्रारी सुरू आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. महापालिकेने काही खासगी रुग्णालये आणि डॉक्टरांची सेवा अधिगृहीत केली आहे.

– पुण्यातील लॉकडाऊनच्या काळात किती रुग्ण वाढले?
दिनांक नवे रुग्ण मृत्यू
14 जुलै 750 25
15 जुलै 1416 15
16 जुलै 1812 17
17 जुलै 1705 11
18 जुलै 1838 18
19 जुलै 1508 44
20 जुलै 1817 31
21 जुलै 1512 30
22 जुलै 1751 39
23 जुलै 1599 41
24 जुलै 1479 36

25 जुलै 1521 27