दळवीनगर चिंचवड येथील गोरगरीब नागरिकांचे घर उद्ध्वस्त केल्यास तीव्र आंदोलन छेडू : बाबा कांबळे- कष्टकरी कामगार पंचायतीच्या बैठकीत इशारा

0
337

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – तीस वर्षांपासून राहत असलेल्या दळविनगर चिंचवड येथील नागरिकांना राहते घर खाली करण्याच्या नोटीस रेल्वे प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळे आत्ता रहायचे कुठे असा सवाल या नागरिकांपुढे उपस्थित होत आहे. त्यामुळे आधी त्यांचे पुनर्वसन करावे मगच घरे खाली करा. मात्र दळवीनगर चिंचवड येथील गोरगरीब नागरिकांचे घर उद्ध्वस्त केल्यास शहरभर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा कष्टकरी पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिला.

दळविनगर येथे आयोजित नागरिकांनच्या जाहिर सभेत बाबा कांबळे बोलत होते.
या वेळी आकुर्डी भागातील सामजिक कार्यकर्ते अजित शितोळे, कष्टकरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष बळिराम काकडे, सदाशिव तळेकर, प्रकाश येशवंते, व्यापारी संघटनेचे चौधरी तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

बाबा कांबळे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीत दळवी नगर येथे 400 ते 500 कुटूंब गेली 30 वर्षापासून राहत आहेत. त्यांचे मतदार यादीत नाव आहे. आधार कार्ड, रहिवासी पुरावासह गेली 30 वर्षाचे सर्व कागदपत्र आहेत. तरी देखील 28 मार्च रोजी रेल्वे विभागाच्या वतीने त्यांना नोटीस देऊन घर खाली करण्यास सांगण्यात आले आहे. या नोटीसमुळे सर्व नागरिक भयभित झाले असून , मुलांची शाळा सुरू आहे, अशा परिस्थितीत आता कोठे जायचे ? असा सवाल त्यांच्यापुढे आहे. हातावर पोट असल्यामुळे व सर्व अनुसूचित जाती, जमाती असल्यामुळे, त्यांचे गेल्या अनेक वर्षापासून पुनर्वसन थांबले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे. परंतु गेली 30 वर्षापासून या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन का झाले नाही? असा सवाल बाबा कांबळे यांनी उपस्थित केला. मग आता रेल्वेने कारवाई केल्यास या सर्व कुटुंबांने कोठे जायचे, असे असंख्य प्रश्न आहेत. जोपर्यंत येथील सर्व नागरिकांचे इतर ठिकाणी पुनर्वसन होत नाही तोपर्यंत अतिक्रमण कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.
कार्यक्रमाच्या संयोजना साठी विक्की भिसे, पवन पाटोळे, मयंक लांडगे, दीपक खिल्लारे, सागर खिल्लारे, नवनाथ कांबळे, अविनाश पांढरकर, वजीर शेख,परिश्रम घेतले,