कॉंग्रेसच्या महागाई विरोधी आंदोलनास उत्स्फुर्त प्रतिसाद…

0
213

पिंपरी,दि. १ (पीसीबी) – रोज वाढणा-या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीमुळे महागाई वाढत आहे. या रोज वाढणा-या महागाईमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. या विरुध्द सर्व नागरिकांनी रस्त्यावर उतरुन केंद्र सरकारचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करावा असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पाच राज्यातील निवडणूकींच्या निकालानंतर मागील आठ दिवसात पाच रुपये साठ पैशांपेक्षा जास्त इंधन दरवाढ करण्यात आली. त्यामुळे भाजीपाला, किराणा माल, कडधान्ये, गॅस अशा जीवनावश्यक सर्वच वस्तूंची भाववाढ होत आहे. महागाईचा हा भस्मासुर सर्व सामान्य जनतेला गिळून टाकेल ही भाववाढ थांबली पाहिजे. या मागणीसाठी आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (दि. १ एप्रिल) पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. कैलास कदम बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते अशोक मोरे, वरिष्ठ शहर उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महिला शहराध्यक्षा सायली नढे, युवक शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, एनएसयुआय प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, माजी नगरसेवक विश्वास गजलमल तसेच दिलीप पांढरकर, सौरभ शिंदे, रवि नांगरे, विजय ओव्हाळ, बाबा बनसोडे, गौतम ओव्हाळ, सचिन कोंढरे, सुनील राऊत, दिनकर भालेकर, आबा खराडे, हिराचंद जाधव, विश्वनाथ जगताप, आकाश शिंदे, डॉ. मनिषा गरुड, आण्णा कसबे, माऊली मलशेट्टी, विशाल सरवदे, गणेश नांगरे, सतिश भोसले, आशा भोसले, अजय काटे, सचिन सोनटक्के, वसंत वावरे, मिलिंद बनसोडे, किरण खोजेकर, मिलिंद फडतरे, उमेश बनसोडे, जेव्हीयर ॲन्थोनी, स्वाती शिंदे, सुप्रिया कदम, सोनु दमवानी, रावसाहेब सरोदे, रमेश वाघमारे, रोशनी बेहराणी, संदिप शिंदे, भारती, घाग, रिया फर्नांडीस, हरीश डोळस, मोहसिन शाह, सुप्रिया पोहरे, दिपाली भालेकर, निर्मला खैरे, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, सुनिता जाधव, स्वाती सपकाळ, सचिन सातपुते, अनिकेत नवले, रवी शेळके, किरण नढे, विष्णु शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. कैलास कदम म्हणाले की, मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे कोट्यावधी नागरिकांचा रोजगार गेला आहे. सर्वसामान्य कुटूंबातील नागरिकांना मुलांची शालेय फि भरणे अवघड झाले आहे. जीवनाश्यक वस्तू देखील माणूस खरेदी करु शकत नाही. गरीबांना संसार करणे देखील आता अशक्य झाले आहे. या भाववाढीला लगाम घालण्याएैवजी आपले पंतप्रधान ‘काश्मीर फाईल’ सारख्या चित्रपटाचे समर्थन आणि प्रोत्साहन करण्यात गुंग आहेत. असल्या चित्रपटांचे समर्थन करुन तरुणांची माथी भटकवायची आणि दंगली घडवून आणायच्या असा कुटील डाव भाजपाचा यामागे आहे. मागील वर्षी दिल्लीत आंदोलन करणा-या साडेसातशे पेक्षा जास्त शेतक-यांना जीव गमवावा लागला. या विषयावर बोलायला पंतप्रधानांना वेळ नाही. याचे साधे सांत्वन देखील त्यांनी केले नाही आणि ‘काश्मीर फाईल’ चे समर्थन करतात. त्याचे समर्थन करायचेच असेल तर नोटाबंदी, गोध्रा हत्याकांड, पुलवामाची घटना, बेरोजगारी, महागाई या विषयांवर देखील चित्रपट काढून त्याचे समर्थन करा. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्व सामान्यांना फसवी आश्वासने द्यायची. प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये देऊ, पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव कमी करु, डाळींच्या किंमती नियंत्रणात ठेऊ अशी आश्वासने देऊन सत्ता मिळवलेल्या भाजपाने अगदी याच्या विरुध्द काम केले. काबाडकष्ट करुन कामगार प्रॉव्हिटंट फंड मध्ये बचत करतो. त्यातून मिळणा-या व्याजावर आणि या बचतीवर कामगार त्यांच्या मुला बाळांचे शिक्षण, लग्न करायचे नियोजन करतो. केंद्र सरकारची वक्रदृष्टी आता कामगारांच्या या बचतीवर पडलेली आहे.

कामगारांच्या पीएफ वर आता अतिरीक्त कर लावण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. ज्येष्ठांच्या सवलती काढून घेण्याचे यांचे नियोजन आहे. समाजातील सर्व घटकांना देशोधडीला लावून भांडवलदारांना पोसण्याचे काम केंद्रातील भाजपा सरकार करीत आहे अशीही टिका डॉ. कैलास कदम यांनी यावेळी केली.
या आंदोलनात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी दुचाकी वाहनांना, गॅस सिलेंडरला हार घालून महागाईचा निषेध केला. तसेच टाळ आणि मृदंग वाजवून केंद्र सरकारच्या विरोधी घोषणा दिल्या.