“दंगलीचे कटकारस्थान करणाऱ्यांना राजाश्रय” : भाजप नेत्याचा अशोक चव्हाणांकडे रोख

0
152

नांदेड, दि.२२ (पीसीबी) : त्रिपुरातील कथित घटनेनंतर राज्यात उसळलेल्या दंगलीची चौकशी करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. नांदेडमध्ये माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली. त्यावेळी बोलताना बोंडे यांनी काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचं नाव न घेता जोरदार टोला लगावलाय.

नांदेडमध्ये झालेल्या दंगलीचे कटकारस्थान करणाऱ्यांना राजाश्रय असल्याचा खळबळजनक आरोप अनिल बोंडे यांनी केलाय. अमरावती, मालेगाव आणि नांदेड इथल्या दंगलखोरांवर कारवाई करा, अशी मागणी करत भाजपनं धरणं आंदोलन केलं. नांदेडमध्ये अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. यावेळी बोंडे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नांदेडमध्ये झालेली दंगल पूर्वनियोजित होती आणि दंगलखोरांना राजाश्रय दिला जात आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, असी मागणीही बोंडे यांनी केली आहे.

राज्यात मालेगाव, अमरावती आणि नांदेड येथे झालेल्या दंगलींची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करावी. या मागणीबरोबरच दंगलीच्या निषेधार्थ ठाणे शहर भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच आमदार आणि जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले.

राज्यात नुकत्याच झालेल्या दंगलीत 15 हजार ते 40 हजार लोकांच्या जमावाने रस्त्यावर उतरून दुकाने, कार्यालये, गाड्या यांचा विध्वंस केला. या प्रकाराचा भाजप निषेध करीत आहे. जमावाने केलेल्या हिंसाचाराची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून प्रामुख्याने अमरावतीत लोक रस्त्यावर उतरले. ते कोण्या एका पक्षाचे नव्हते वा कोणी त्यांचे नेतृत्व करत नव्हते. मात्र, स्वसंरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरही हल्ले केले गेले. त्यानंतर पोलिस यंत्रणेकडून पक्षपाती पद्धतीने कारवाई केली जात आहे. अफवा पसरवून दंगल करणाऱ्यांना पाठीशी घालून स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या सामान्य लोकांना मात्र पोलिसांकडून लक्ष्य केले जात आहे, असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

ग्रामीण आणि शहरातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने औरंगाबादमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. या मोर्चात आमदार अतुल सावे, आमदार हरीभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब, बसवराज मंगरुळे, प्रवीण घुगे, इद्रीस मुलतानी आदींची उपस्थिती होती. 12 नोव्हेंबर रोजी राज्यभरात मुस्लिम संघटनांनी निदर्शने केली. त्यानंतर राज्यातील काही ठिकाणी या दिवशी हिंसक कारवाया घडून आल्या. त्याचे पडसाद अमरावतीसह अन्य काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी उमटले. मात्र विविध ठिकाणी पोलिसांनी केवळ भाजप कार्यकर्त्यांच अटक करत एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या दडपशाहीविरोधात जोरदार आंदोलन उघडणार असल्याचा इशारा भाजपने दिला होता. या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात भाजपच्या वतीने निषेधात्मक आंदोलन करण्यात येत आहे.