थ्री इडियट्समध्ये करिना कपूर परत येते तशी शिवसेनाही परत येईल – सुधीर मुनगंटीवार

0
598

नागपूर,दि.१९(पीसीबी) – सध्या नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी रंगल्याचे चित्र दिसले.सभागृहामध्ये सत्ताधारी आमदार आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये चकमकीही झाल्या. फडणवीस यांच्या भाषणानंतर भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही आपल्या भाषणामधून शिवसेनेचा समाचार घेतला.

मुनगंटीवार यांनी फिल्मी स्टाइल टीका केली. त्यांनी ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ या गाण्याचा उल्लेखही आपल्या भाषणामध्ये केला. “थ्री इडियट्स चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे करिना कपूर परत येते तसेच आम्ही आणि शिवसेना परत एकत्र येऊ. त्यामुळेच मी आता शिवसेनेवर जास्त बोलत नाही,” असे वक्तव्य मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी केले. या वक्तव्यानंतर सभागृहामध्ये एकच हशा पीकला.

मुनगंटीवार यांच्या भाषणाबरोबरच फडणवीस, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनीही आपल्या भाषणामधून विरोधकांवर शाब्दिक बाण सोडले. फडणवीस यांनी मागील सरकारने शेतकऱ्यांसाठी, उद्योगधंदे, रस्ते, पाणीपुरवठा योजनांवर खर्च केलेली आकडेवारी सांगितली. त्यावर मुंडे यांनी फडणवीस अजूनही मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत आहेत असे वागत आहेत, असा टोला लगावला.