थेरगांव, मंगलनगर येथील शाळांसमोरील बेकायदा पार्किंग हटवा; मानवाधिकार संघटनेचे पोलीस आयुक्तांना निवेदन

0
563

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – थेरगाव, मंगलनगर येथील शाळांच्या रस्त्यावर बेकायदा चारचाकी वाहने उभी केली जातात. या वाहनांच्या आडोशाला प्रेमीयुगूल विचित्र चाळे करत असल्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मानवाधिकार संघटनेच्या वतीने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

याबाबत पोलीस आयुक्त आर.के.पद्‌मनाभन यांना संघटनेचे राष्ट्रीय निरीक्षक रामराव नवघन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंगलनगर येथे श्री कांतिलाल खिंवसरा शाळा आणि महापालिकेची शाळा आहे. या शाळांच्या रस्त्यावर आणि समोर स्थानिक रहिवाशांकडून बेकायदेशीर वाहने लावली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. तसेच  या वाहनांच्या आडोशाला प्रेमीयुगुल विचित्र चाळे करत असतात. टवाळखोर आणि अनेक तळीराम येथे वाहने उभी करून दारू पीत बसलेले असतात. त्याचा नाहक त्रास स्थानिक रहिवाशांना होत आहे. सर्वसामान्य  नागरिकांसाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे.

त्यामुळे शाळांसमोरील बेकायदा पार्किंग हटवावे आणि सायंकाळनंतर  दोन ते तीन वेळा  पेट्रोलिंग  करणारे पोलीस कर्मचारी पाठवावेत. तसेच येथील वाहनांवर कारवाई करून  या ठिकाणी ‘नो पार्किंग’चे  फलक लावण्यात यावेत, अशी मागणी या निवेदनात संघटनेकडून करण्यात आली आहे.

यावेळी राज्य कार्याध्यक्ष भरत वाल्हेकर, जिल्हाध्यक्ष सुभाष कोठारी, निरीक्षक दिलीप टेकाळे, मुनीर शेख, विकास कांबळे, अविनाश रानवडे, ओंकार शेरे, लक्ष्मण दवणे, डॉ. सतीश नगरकर, प्रसाद देवळालीकर, जयवंत कुदळे, वैभव कादवाने, भास्कर घोरपडे, सोहनलाल राठोड, आदी उपस्थित होते.