‘त्या’ रात्रीची शतपावली ठरली शेवटची

0
284

चिंचवड स्टेशन, दि. ११ (पीसीबी) -रात्रीच्या वेळी आपल्या श्वानांसोबत शतपावली करत असलेल्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 9) रात्री अकरा वाजता संभाजीनगर, चिंचवड येथे घडली.

तेजस कृष्णा दंदाडे (वय 35, रा. संभाजीनगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मयूर राजेंद्र चिंचवडे (वय 35, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मेहुणे मयत तेजस हे शुक्रवारी रात्री अकरा वाजताच्या सुमरास जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी त्यांच्या श्वानांसोबत घरासमोर फिरत होते. त्यावेळी एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. त्यामध्ये तेजस गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर आरोपी वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच तेजस यांना रुग्णालयात दाखल न करता तिथून पळून गेला. तेजस यांना झालेल्या जखमांमधून अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.