…त्यावेळी बाळासाहेबांमुळे युती टिकायची – मुख्यमंत्री फडणवीस

0
802

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – त्यावेळी शिवसेना-भाजपची  युती झाल्यामुळेच आम्ही येथपर्यंत पोहोचू शकलो.  तेव्हा युती झाली नसती, तर आमचा येथेपर्यंत प्रवास झाला नसता. आमच्या युतीमध्ये काही अडचणी आल्या की,  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मोठय़ा मनाने निर्णय करायचे आणि त्यामुळे युती टिकायची, आताही आम्ही मार्ग काढू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) येथे व्यक्त केला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’या चित्रपट येत्या २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांना ‘मानाचा मुजरा’ हा कार्यक्रम  आज नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी  सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री  फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री  म्हणाले की, युतीमध्ये अनेकदा अडचणी यायच्या. त्यावेळी आम्ही लहान कार्यकर्ते होतो. आम्हाला फक्त ‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा. तेव्हा युतीच्या चर्चा काय व्हायच्या ते माहिती नाही. मात्र तेव्हा अडचण आली तर बाळासाहेब ठाकरे त्यावेळेस मोठय़ा मनाने निर्णय करायचे. त्यामुळे युती टिकायची. तेव्हा प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे होते. बाळासाहेबांशी बोलून कसा मार्ग काढायचा हे प्रमोद महाजन बघत असत. आता ती जबाबदारी आमच्यावर आहे. आम्ही मार्ग काढू. चिंता कशाला करता, असे म्हणताच  सभागृहात एकच हशा पिकला.