तूर्तास चौकशीची गरज नाही, कार्यालयात येऊ नका; ईडीचा शरद पवारांना ईमेल

0
682

मुंबई, दि. २७ (पीसीबी) –  सध्या तुमच्या चौकशीची गरज नसून ईडीच्या कार्यालयात येण्याची काही गरज  नाही. तसेच भविष्यात गरज लागेल, तेव्हा तुम्हाला आम्ही नोटीस किंवा समन्स पाठवू त्यांनतर तुम्ही येऊ शकता,  असा ईमेल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) पाठवण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शरद पवार स्वत: ईडीच्या कार्यालयात आज दुपारी जाणार आहेत. शरद पवार यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून मेल करत आपण ईडीच्या कार्यालयात येत असल्याचे सांगितले होते.  या मेलला ईडीने उत्तर दिले आहे.   तूर्तास चौकशीची गरज नसल्याचे त्यात म्हटले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीदेखील ईडीकडून मेल आला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र तरीही शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचे त्यांनी  सांगितले आहे. आम्ही त्यांना प्रश्न विचारण्यासाठी जाणार आहोत. तुम्ही येऊ नका हे सांगण्याचा त्यांना अधिकार नाही, असे  मलिक यांनी म्हटले आहे.