ईडीच्या कार्यालयामध्ये येण्याचे शरद पवार ठरवू शकत नाहीत

0
479

मुंबई, दि. २७ (पीसीबी) –  ईडीच्या कार्यालयामध्ये येण्याबाबत शरद पवार ठरवू शकत नाहीत. चौकशीला बोलावल्यानंतरच पवारांना यावे लागेल, असे ईडीच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (शुक्रवार) दुपारी २ वाजता ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत.

यावर ईडीच्या कार्यालयात जाण्याआधीच ईडीने कठोर भूमिका घेतली आहे.  शरद पवार आरोपी आहेत, ईडी कार्यालयात जाण्याचा निर्धार शरद पवारांनी केला असला तरी त्यांना कार्यालयात प्रवेश मिळणार नाही, असे ईडीच्या सूत्रांनी  म्हटले आहे.

दरम्यान, ईडी कार्यालयाच्या परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ईडी कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.

ईडी कार्यालयात जाण्याआधी शरद पवारांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे. ईडी कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, तसेच अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन  पवारांनी कार्यकर्त्यांना केले आहे.