तीन भावांचा अवघ्या 15 दिवसात कोरोनाने मृत्यू

0
917

पुणे, दि. ८ (पीसीबी) : शिरुर येथील एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या कुटुंबातील तीन भावांचा अवघ्या 15 दिवसात कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीत एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे ही दुर्देवी घटना घडली. पोपट धोंडिबा नवले (वय 58) यांचा 15 एप्रिल रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि उपचारादरम्यान 23 एप्रिल रोजी त्यांचं निधन झालं. त्यांनतर अवघ्या चार दिवसांनी 27 एप्रिल रोजी त्यांचा दुसरा भाऊ सुभाष धोंडिबा नवले (वय 55) यांच्यावर काळाने झडप घातली आणि 6 मे रोजी त्यांचा तिसरा भाऊ विलास धोंडिबा नवले (वय 52) यांचे निधन झाले. अवघ्या 15 दिवसातच एकाच कुटुंबातील तीन कर्तेधर्ते पुरुष सोडून गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. शिरूर तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य यंत्रणा कमी पडू लागल्याने वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्णांचे मृत्यू होत आहेत.

पुण्यात कंटेन्मेंट झोनची संख्या घटली
दरम्यान, पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुण्यातील 500 वर गेलेली मायक्रो कंन्टेमेंट झोनची संख्या दहा दिवसात घटली आहे. शहरात रुग्णसंख्येत घट झाल्यानं मायक्रो कंन्टेमेंटची संख्या 178 नी घटली आहे. ही संख्या दहा दिवसात 497 वरून थेट 312 वर आली आहे. मात्र, असे असले तरीही पुणेकरांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. 5 पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून पालिका जाहीर करते. पुण्यात सध्या हडपसर, मुंढवा, धनकवडी कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. हडपसरमध्ये 62 तर धनकवडीत 54 मायक्रो कंन्टेमेंट झोन आहेत.