तिने केले ऑनलाईन डेटिंग अन् पुढे असे घडले…

0
203

वाकड, दि. २४ (पीसीबी) – ऑनलाईन डेटिंग अॅपवरून ओळख झालेल्या मैत्रिणीने भेटायला बोलावून तरुणाला कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध मिसळून लुटले. तरुणाकडून सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि रोख आणि रोख रक्कम असा एकूण दीड लाखांचा ऐवज डेटिंग अॅपवरील मैत्रिणीने लंपास केला. हा प्रकार 18 जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता सयाजी हॉटेलमध्ये घडला.

आशिषकुमार बी (वय 30, रा. रेल नगर, कोयमबिडू, चेन्नई) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आणि फिर्यादी आशिषकुमार यांची बंबल या डेटिंग अॅपवरून ओळख झाली. त्यातून दोघेजण दररोज एकमेकांसोबत चॅट करू लागले. दरम्यान, महिलेने तिला कामाची गरज असल्याचे सांगून आशिषकुमार यांना चेन्नई वरून पुण्याला भेटायला बोलावले.

दोघांनी पुणे-मुंबई महामार्गावर असलेल्या सयाजी या आलिशान हॉटेलमध्ये रूम बुक केली. 18 जानेवारी रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास महिलेने आशिषकुमार यांना कोल्ड्रिंगमधून गुंगीकारक औषध पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर आशिषकुमार यांच्या अंगावरील 90 हजारांची सोन्याची चेन, 25 हजारांची सोन्याची अंगठी, 20 हजारांचा मोबाईल फोन आणि 15 हजारांची रोख रक्कम असा एकूण एक लाख 50 हजारांचा ऐवज घेऊन डेटिंग अॅपवरील मैत्रीण पळून गेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.