तब्बल तीन वर्षानंतर नोंदवला गेला पतीवर अपघाताचा गुन्हा…

0
277

मोशी, दि. २४ (पीसीबी) – बनकर वस्ती, मोशी येथे एका वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर आकुर्डी येथील अपघातात पतीच्या निष्काळजीपणे दुचाकी चालवण्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या पत्नीचा मृत्यू झाला. याबाबत शनिवारी (दि. 23) एमआयडीसी भोसरी आणि निगडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात मुक्तार लोटन शेख (वय 47, रा. खंडोबा माळ, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शाहिद बादुल्ला खान (वय 50, रा. सवईमाधवपूर, राजस्थान) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकील लोटन शेख (वय 37, रा. डोंगरेवस्ती, कुरुळी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

आरोपी शाहिद याने महिंद्रा कंपनीचे आरटीओ पासिंग नसलेले वाहन भरधाव वेगाने चालवून वकील शेख जात असलेल्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात वकील शेख यांच्या डोक्यावरून वाहनाचे मागील चाक गेले. त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 23) दुपारी दीड वाजता बनकर वस्ती, मोशी येथील विक्रांत नर्सरी समोर घडला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

निगडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक राजेश मोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विलास माधव कदम (वय 48, रा. घरकुल, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विलास कदम याच्या 40 वर्षीय पत्नीचा मृत्यू झाला आहे. ही घटना 8 नोव्हेंबर 2017 रोजी सीबीआय क्वार्टर जवळ आकुर्डी येथे घडली. याबाबत तीन वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विलास आणि त्याची पत्नी दुचाकीवरून सीबीआय क्वार्टर, आकुर्डी येथून जात होते. विलास याने भरधाव वेगात, निष्काळजीपणे दुचाकी चालवून अपघात केला. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या पत्नीचा मृत्यू झाला. याबाबत तीन वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्या विलंबाने गुन्हा दाखल करण्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.