तारीख ठरली; राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिकांचा मोदींच्या उपस्थितीत भाजप प्रवेश   

0
643

कोल्हापूर, दि. २६ (पीसीबी) –  कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक ३१ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार  आहेत. पंतप्रधान मोदी  सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत, त्यावेळी महाडिक यांचा पक्ष प्रवेश होईल, अशी माहिती सूत्रांकडून  दिली जात आहे. 

पंतप्रधानांचा सोलापूर दौरा निश्चित होत नसल्याने धनंजय महाडिक यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडला आहे. आता  ३१ ऑगस्ट रोजी मोदी सोलापूर दौऱ्यावर  येणार आहेत. त्यावेळी महाडिक यांचा भाजप प्रवेश होईल. अन्यथा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाडिक यांचा भाजप प्रवेश होईल.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या नेत्यांनी सहकार्य न केल्याने धनंजय महाडिक नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. महाडिक यांचा भाजप प्रवेश झाल्यास  कोल्हापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.