ताथवडे येथे कंपनीतील कामगाराला टोळक्यांकडून बेदम मारहाण

0
1393

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – “गाववाल्याचा नाद करु नकोस” तु कंपनीत कसा काय कामाला जातो बगतोच, असे म्हणून कंपनीच्या बसने कामाला निघालेल्या एका कामगाराला चार जणांच्या टोळक्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवार (दि.२२) रात्री साडेआठच्या सुमारास ताथवडे येथील सर्व्हिस रस्त्यावरील मयुर पीग फार्मजवळ घडली.

माधव विठ्ठलराव वळसंगे (वय २७, रा. आनंद टिळेकर यांची चाळ, कृष्ण मंदीर पाठीमागे देहुगाव) असे मारहाणीत जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी त्याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चार अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास जखमी माधव वळसंगे हे त्यांच्या कंपनीच्या सतरासीटर बसने ताथवडे येथील सर्व्हिस रस्त्यावरील मयुर पीग फार्मजवळून जात कंपनीत कामाला निघाले होते. यावेळी चार अज्ञात हल्लेखोरांनी बसच्या अडवी त्यांची कार लावली आणि बसच्या ड्रायवरला बसखाली उतरवून पुढे जायला सांगितले. त्यानंतर आरोपींनी माधव यांना “गाववाल्याचा नाद करु नकोस” तु कंपनीत कसा काय कामाला जातो बगतोच, असे म्हणून लाकडी दांडक्याने डोक्यात आणि पायावर मारुन जबर जखमी केले. याप्रकरणी चौघा अज्ञात आरोपींविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. वाकड पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.