तळेगावमध्ये डम्परच्या धडकेत चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; आई गंभीर जखमी

0
837

तळेगाव, दि. २९ (पीसीबी) – आपल्या चार वर्षीय चिमुकल्याला घेऊन दाजीसोबत दुचाकीवरुन जात असताना भरधाव डम्परने दिलेल्या जोरदार धडकेत चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सोमवारी (दि.२८) दुपारी चारच्या सुमारास तळेगाव एमआयडीसी गोळेगावाड येथे घडली.

युवराज भालचंद्र वाघमारे (वय ४) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. त्याची आई रेश्मा भालचंद्र वाघमारे या गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी डम्पर चालक भागवत माधव कदम (वय ३७, रा. मामुर्डी, देहुरोड) यांच्या विरोधात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी चारच्या सुमारास रेश्मा वाघमारे या त्यांच्या चार वर्षीय मुलगा युवराजला घेऊन दाजी मारुती धोगरे यांच्या दुचाकीवरुन (क्र.एमएच/१४/केएक्स/३५७८) घरी चालल्या होत्या. यावेळी भरधाव ट्रक (क्र. एमएच/१२/डीटी/११२५) याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये रेशमा आणि मारुती दोघे गंभीर जखमी झाले. तर चार वर्षीय युवराजचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच डम्परचालक भागवत कदम फरार झाला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.