तळवडे येथे भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
500

तळवडे, दि. २७ (पीसीबी) – भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२५) रात्री पावणेनऊच्या सुमारास त्रिवेणीनगरकडून तळवडेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

प्रकाश कुमार भोये असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे बंदू राजु कुमार भोये (वय ४०, रा. भैरवनाथ हौसिंग, सोसायटी, रुपीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, (एमएच/१४/बिजे/२७५३) या क्रमांकाच्या ट्रकवरील चालक संजय विठ्ठल रुपनवर (वय २२, रा. केशवनगर, चिंचवड) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास फिर्यादी राजु भोये यांचे बंदू प्रकाश भोये हे त्यांची दुचाकी (क्र. एमएच/१४/एक्यू/६८४८) वरुन त्रिवेणीनगरकडून तळवडेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील सुप्रिम पॅकेजींग कंपनीसमोरील रस्त्यावरुन जात होते. यावेळी मागून येणाऱ्या ट्रक (क्र.एमएच/१४/बिजे/२७५३) वरील चालक संजय याने प्रकाश यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.  तसेच कार (क्र. एमएच/१४/डिएफ/४४००) ला जोरदार धडक देऊन नुकसान केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रकाश यांचा मृत्यू झाला. चिखली पोलीस तपास करत आहेत.