‘…तर राज्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन’

0
464

मुंबई, दि.२१ (पीसीबी) : कोरोना संपुष्टात आलेला नाही. तिसऱ्या लाटेचाही धोका आहे. गर्दी वाढत राहिली तर तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येईल, असं सांगतानाच राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला तर राज्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. तसेच मुख्यमंत्र्यांनी रॅली काढून गर्दी जमवणाऱ्या विरोधकांनाही नाव न घेता फटकारले.

मुंबई महानगर पालिका आणि मुंबई विद्यापीठाने लहान मुलांचे कोव्हिड सेंटर उभारले आहे. त्याचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. ऑक्सिजन साठ्यात फार काही विशेष वाढ झालेली नाही. तो ज्यावेळी 700 मेट्रिक टन टच करू एवढं ऑक्सिजनची गरज आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज पडल्यास राज्यात कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

संसर्ग वाढणार नाही, पण –
आज जनतेच्या सेवेसाठी दोन आरोग्यसेवेचे लोकार्पण झाले आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. इतर देशात, राज्यात लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढलेला आहे. आपल्याकडे हा संसर्ग वाढणार नाही. तरी आपण सर्व गोष्टींची तयारी ठेवत आहोत. त्याच अनुषंगाने लहान मुलांना कोव्हिडची लागण झाली तर त्यांना रुग्णलयाचं भयावह वातावरण न वाटता चांगलं वातावरण तयार करण्यासाठी हे सेंटर उभारले आहेत, असं ते म्हणाले.

तर तिसरी लाट लवकर येईल –
आता सुद्धा मी गर्दी बघितली. ही गर्दी योग्य नाही. आपण सर्व काळजी घेऊन अर्थचक्र सुरू राहावे म्हणून काही निर्बंधामध्ये शिथिलता आणली आहे. कोणत्याही राजकीय स्वार्थ किंवा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल असं वर्तन करू नका. सर्व राजकीय पक्षांना, धार्मिक, सामाजिक संघटनाना मी विनंती करतो की, आपल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येईल किंवा येतोय असं काही करू नका, असं कळकळीचं आवाहन करतानाच कोरोना संकट अजूनही टळलेलं नाही. आपल्याला हे टाळायचा आहे. आपण जर नियम पाळले नाहींतर कदाचित तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येईल. लॉकडाऊन टाळायचा असेल तर कोणीही कितीही चिथावणी दिली, भडकवलं तरी त्यांच्या चिथावणीला दाद देऊ नका, असं आवाहनही त्यांनी केलं.