लाचखोरीतील स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांचा कोठडीतील मुक्काम वाढला

0
856

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – चिंचवड महापालिकेतील होर्डिंगची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी 10 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या स्थायी समतीच्या अध्यक्षासह इतरांचा पोलिस कोठडीतील मुक्काम सोमवारपर्यंत वाढला आहे. न्यायालयाने आणखी दोन दिवस पोलिस कोठडीची मुदत वाढविली आहे. दरम्यान, ऑडिओ क्लिपमधील संवादाच्या आधारे स्थायी समितीच्या १६ सदस्यांना पैसे द्यावे लागतात, या विधानाच्या अनुशंगाने अन्य १५ सदस्यांचीही चौकशी होणार असल्याने त्या सर्वांचे धाबे दणानले आहेत.

स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे त्यांचा पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (वय 56, रा. भोसरी), शिपाई अरविंद भीमराव कांबळे (रा. भीमनगर पिंपरी), संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे (रा. थेरगाव, वाकड) आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया (रा. धर्मराजनगर) यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. लांडगे यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे याने तक्रारदार ठेकेदाराला टक्केवारीचे पैसै ‘वर १६ जणांना द्यावे लागतात’ असे सांगितले. तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांनीच पिंगळे याला टक्केवारीबाबत आदेश दिल्याचे संभाषण व्हॉइस रेकॉर्डवर रेकॉर्ड झाले आहे. याबाबत आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी संबंधित 16 व्यक्तींची नावे सांगण्यास नकार दिला आहे. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करण्यासाठी व गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरपींच्यो पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती.

त्यानुसार न्यायालयाने सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ केली आहे. तक्रारदार हे जाहिरात ठेकेदार आहे. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेडील २६ वेगवेगळ्या जागांमध्ये होर्डिंग उभारण्यासाठी निविदा भरल्या होत्या. 2019 व 2020 च्या निविदा मंजूरही झाल्या. मात्र वर्क ऑर्डर निघाली नसल्याने त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे याच्याशी संपर्क केला. त्याने बोली रकमेच्या तीन टक्के रक्कमेनुसार 10 लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती सहा लाख रुपयांचे देण्याचे ठरले. त्यातील एक लाख 18 हजार रुपयांची रक्कम पहिल्या टप्प्यात देण्याचे ठरले आणि उर्वरित रक्कम वर्क ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर देण्याचे ठरले. एक लाख 18 हजार रुपयांची रक्कम पिंगळे यांनी स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटककारवाई केली आणि पाच जणांना अटक केली.

दरम्यान, लाचलुचपत विभागाने स्थायी समितीच्या अन्य सदस्यांकडे मोर्चा वळविल्याने महापालिकेत मोठी खळबळ उडाली आहे. नगरसेवकांची पळापळ सुरू असून कारवाई टाळण्यासाठी भेटीगाठी सुरू आहेत. लांडगे यांच्या घर आणि महापालिका कार्यालयात नेमकी किती रोकड मिळाली याबाबतचे गूढ वाढत चालले आहे. त्याशिवाय स्थायी समिती बैठकीनंतर सदस्यांना टक्केवारीची रक्कम पाकिटातून दिली जाते, अशा नावांसह १६ पाकिटे मिळाल्याने संबंधीत सद्स्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे समजले. लाचखोरीच्या प्रकऱणात भाजपाची प्रचंड बदनामी झाल्याने आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संबंधीत जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई कऱणार असल्याचे जाहिर केल्याने स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह १० सदस्यांचे भवितव्य अंधारात असल्याचे सांगण्यात आले.