…तर तुम्हाला कान पकडून १०० उठा-बशा काढाव्या लागतील; ममता बॅनर्जींचा मोदींना इशारा  

0
509

कोलकाता, दि. ९ (पीसीबी) – पंतप्रधान मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील कलगीतुरा सुरूच आहे. दोन्हीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.     कोळसा माफियांशी आमच्या पक्षातील कोणाचाही संबंध असल्याचा आरोप तुम्ही सिद्ध करा, नाही तर तुम्हाला जनतेसमोर कान पकडून १००  उठा-बशा काढाव्या लागतील, असा इशारा  बॅनर्जी यांनी मोदी यांना दिला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी तृणमूल काँग्रेसमधील नेत्यांचे कोळसा माफियांशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांना ममता यांनी जोरदार उत्तर दिले आहे. जर मोदी हे आरोप सिद्ध करु शकले, तर लोकसभा निवडणुकीतून मी माझे ४२ उमेदवार मागे  घेईन.  आणि जर मोदी यांचे आरोप सिद्ध  झाले नाही तर त्यांना जनतेसमोर  दोन्ही कान धरुन १०० उठा-बशा काढाव्या लागतील, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, पंतप्रधान मोदी  बांकुरा येथील एका प्रचारसभेतील  भाषणात म्हणाले होते की, पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या कोळसा माफियांचे राज्य सुरु आहे. ज्या लोकांनी  येथे काम करायला हवे, त्यांना त्यापासून वंचित ठेवले जात आहे. येथील परिस्थिती भीषण बनली आहे, असे मोदी म्हणाले होते.