तब्बल ५३३ कनिष्ठ अभियंत्यांनाही पुणे शहरात कोरोनाची ड्युटी; पाणी, ड्रेनेजसह दैनंदिन देखभाल दुरुस्ती आता वाऱ्यावर

0
380

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – कोरोनाचा वाढता प्रसार पाहता अधिकचे मनुष्यबळ हाताशी पाहिजे म्हणून आता पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि नगरपालिकांच्या ५३३ कनिष्ठ अभियंत्यांना पुणे शहरातील कोव्हिड-१९ च्या कामासाठी अधिग्रहित (ड्युटी) करण्यात आले आहे. पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी त्यासंदर्भातील आदेश काल (शनिवारी) जारी केले. रोजचे काम सोडून नवीन ही ड्युटी लागल्याने आता सर्व कनिष्ठ अभियंत्यांमध्ये मोठी घबराट आहे.

पुणे शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यात अद्याप म्हणावे असे यश यायला तयार नाही. महापालिका प्रशासन पूर्णतः अपयशी ठरताना दिसते आहे. आता स्वतः जिल्हाधिकारी यांनी सर्व सुत्रे हातात घेतली आहेत. पुणे शहरात रोज १००-१२५ च्या दरम्यान रुग्णांची वाढ होताना दिसते. शुक्रवारी १३५ तर शनिवारी १६० नवीन रुग्ण आढळले. मृतांचा आकडाही वाढतोच आहे.

शुक्रवारी १२ जणांचा, तर शनिवारी ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून केंद्र सरकारचे एक स्वतंत्र पथक आता दुसऱ्यांदा शहरात दाखल झाले आहे. त्यानंतर सर्व सुत्रे हालली आणि नव्याने काही आदेश काढण्यात आले. त्यात दोन्ही महापालिका, जिल्हा परिषद, जिल्ह्यातील नगरपालिका या स्थानिक संस्थामध्ये काम करणाऱ्या ५३३ कनिष्ठ अभियंत्यांची सेवा अधिग्रहित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काढले. कनिष्ठ अभियंत्यांची यादी सोबत जोडली आहे. पुढील आदेश येईपर्यंत पुणे महापालिका यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करावे तसेच आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय दंड विधान १८६० कलम १८८ नुसार सर्व संबंधीत दंडनिय कार्यवाहीस पात्र राहतील असे आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेतील बहुतांश कनिष्ठ अभियंत्यांना कोरोनाची ड्युटी अगोदरच सोपविण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड शहरातदेखील रोज १०-१५ रुग्णांची संख्या वाढते आहे. शहरातील पाणी पुरवठा, ड्रेनेज या दैनंदिन देखभालीची कामे याच अभियंत्यांकडे आहेत. शहरात बेघर, परप्रांतीय मजूर तसेच अडचणीत सापडलेल्यांना दोन वेळच्या भोजन व्यवस्थेसाठी अगदी कच्चा माल पुरवठा करणे, किचन सांभाळणे आणि भोजन पोहच करण्याचे काम हेच अभियंते करतात. आता त्यांना पुन्हा हे दुसरे काम आणि तेपण थेट पुणे शहरात लागल्याने कनिष्ठ अभियंते टेन्शनमध्ये आहेत. कोणीतरी जाणीवपूर्वक या यादीत पिंपरी चिंचवड शहरातील या अभियंत्यांचा समावेश केला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत सेवेला असणारे १७० अभियंते याच शहरात राहतात. कोरोनाच्या ड्युटीसाठी रोज त्यांना पुणे शहरात जायचे आहे. आता त्यांनाही कोरोनाची बाधा होण्याची भिती मनात आहे. ठाणे महापालिकेत सेवेला असणाऱ्या परंतु मुंबईत राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे कोरोनाचा प्रसार झाल्याचे उदाहरण आहे. ठाणे शहरात काही अधिकारी आणि त्यांचे कुटुंबिय बाधीत झाले. मुंबई, पुणे शहरात ड्युटीवर असणाऱ्या ७२६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. या बातम्या वाचून आता पुणे शहरात ड्युटी लागल्याने कनिष्ठ अभियंत्यांमध्ये काहीसे भितीचे वातावरण असल्याचे त्यांच्याशी चर्चा करताना समजले.