पिंपरी चिंचवड क्षेत्रातील नॉन कंनटेन्मेंट झोन मधील उद्योग सुरु करण्यास आठवड्यात परवानगी

0
580

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नॉन कंनटेन्मेंट झोन मधील उद्योग सुरु करण्यास येत्या आठवड्यात परवानगी देणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज सांगितले. पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या उपस्थितीत या विषयावर आज महापालिकेत बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे ,शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर ,विरोधी पक्षनेते नाना काटे ,उद्योजक विनोद बन्सल व बालाजी ऐय्यर यांनी बैठकीत सहभाग घेतला आणि उद्योग सुरु करण्यासंबंधी निवेदन केले.

आयुक्त हर्डीकर यांनी पत्रकारांनी बैठकीतील चर्चेची माहिती दिली. ते म्हणाले, महानगरपालिका परिसर रेड झोन असल्यामुळे येथील उद्योग चालू करण्यासाठी स्वतंत्र नियमावली व अर्ज करण्यासाठी स्वतंत्र ऍप व पोर्टल बनवायचे काम चालू आहे.महाराष्ट्र शासनाची परवानगी येताच उद्योजकांनी आपले अर्ज या ऍप किंवा पोर्टल वर सादर करावेत. उद्योग सुरु केल्यानंतर सर्व नियम व अटींचे पालन उद्योजकांनी करावे.

दोन दिवसांपूर्वी संदिप बेलसरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांच्याशी पिंपरी चिंचवड परिसरातील उद्योग सुरु करण्यासंबंधी चर्चा केली होती .त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार उद्योग सचिव भूषण गगराणी ,पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई यांना त्याबाबत सुचना केली होती .त्यासंबंधी काल पुणे येथे मा अजितदादांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम ,महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नॉन कनटेन्मेन्ट झोन मधील उद्योग त्वरित चालू करण्यासंबंधी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते. बैठकीत आयुक्त हर्डीकर यांनी महाराष्ट्र राज्य उद्योग सचिव भूषण गगराणी यांना पिंपरी चिंचवड परिसरातील नॉन कंनटेन्मेन्ट झोन मधील उद्योग सुरु करण्याबाबत प्रस्ताव पाठवला आहे व त्यांनी येत्या 12 तारखेपर्यंत महाराष्ट्र शासनाकडून परवानगी मिळेल असे हर्डीकर यांना फोनवर कळविले आहे, असे सांगितले.