तबलिगी मर्कझमध्ये सहभागी झालेल्या पुण्यातील ६० जणांना ठेवले क्वारंटाइनमध्ये

0
502

 

नवी दिल्ली, दि.१ (पीसीबी) – दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांत पुण्यातील अनेकजण सहभागी झाल्याचे समोर आले आहे. सहभागी झालेल्या ६० जणांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर इतरांचा शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली.

कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत संचारबंदी लागू असतानाही धार्मिक कार्यक्रम करण्यात आला होता. त्यामुळे सरकारी आदेशांचे उल्लंघन झाले होते. याप्रकरणी साथीचा आजार कायदा आणि भारतीय दंडविधाननुसार मौलाना साद आणि इतर तबलीघी जमात सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यातील काहीजण यात सहभागी झाले होते. त्यापैकी ६० जणांना जिल्हा प्रशासनानं क्वारंटाइनमध्ये ठेवलं आहे. त्यापैकी कुणालाही करोनासदृश्य लक्षणं दिसून आलेली नाही. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. इतरांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

निजामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी शेकडो लोक उपस्थित होते. कोरोना विषाणूचा मोठा धोका निर्माण झालेला असताना शेकडो लोकांना एकत्र आणणे, ही अत्यंत बेजबाबदारपणाची कृती होती, असे सरकारने म्हटले आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे शेकडो लोकांचे जीव धोक्यात आले.